इराणचे माजी सर्वोच्च नेते अली खामेनी यांच्या अंत्यविधीची तारीख जाहीर; 9 जुलै रोजी होणार दफनविधी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमेरिका आणि इराणमधील युद्ध थांबले असून आता लवकरच शांतता करारावर स्वाक्षरी होणार असल्याची माहिती अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे. तसेच इराणकडूनही दिवंगत सर्वोच्च नेते अली खामेनी यांच्या अंत्यविधीची तारीख जाहीर करण्यात आली आहे. प्रशासनानुसार शासकीय अंत्यविधी ४ जुलै रोजी सुरू होतील आणि ९ जुलै रोजी मशहद येथे दफनविधी होईल. या अंत्यविधाला २ कोटी लोक उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

तेहरानचे महापौर अलीरेझा झाकानी यांनी सांगितले की, दिवंगत सर्वोच्च नेते अली खामेनी यांचे शासकीय अंत्यविधी पुढे ढकलण्यात आला आहे. मुहर्रमचे पारंपरिक विधी आणि शोकसभांमध्ये व्यत्यय येऊ नये, यासाठी हे करण्यात आले आहे. फार्स वृत्तसंस्थेला दिलेल्या निवेदनात अलीरेझा झाकानी म्हणाले की, मुहर्रमनंतर १० दिवसांनी अंत्यविधी आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला. लोकांनी इमाम हुसेन यांच्यासाठी आपला वार्षिक शोक पूर्ण भक्तीभावाने आणि परंपरेनुसार पाळावा, यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. शिया समुदायासाठी इमाम हुसेन यांचे विशेष महत्त्व आहे.

इ.स. ६८० मध्ये कर्बलाच्या लढाईत हौतात्म्याच्या स्मरणार्थ दरवर्षी मुहर्रममध्ये मोठ्या प्रमाणावर धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात. याच कारणास्तव, अली खामेनी यांच्या अंत्यविधीला ४ जुलै रोजी सुरुवात होईल आणि ९ जुलै रोजी मशहदमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील. त्यावेळी मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे.

दिवंगत सर्वोच्च नेत्याच्या अंत्यविधीला जगभरातून अंदाजे २ कोटी लोक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. म्हणूनच सुरक्षा, वाहतूक आणि सार्वजनिक सुव्यवस्थेसाठी व्यापक तयारी सुरू आहे. अली खामेनी यांनी जवळपास ३७ वर्षे इस्लामिक प्रजासत्ताकाचे नेतृत्व केले.

२८ फेब्रुवारी रोजी मध्य तेहरानमधील त्यांच्या निवासस्थानी अमेरिका आणि इस्रायलच्या संयुक्त हल्ल्यात अली खामेनी यांचा मृत्यू झाला. त्याच दिवशी मध्यपूर्वेतील संघर्ष सुरू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर, ४ मार्च रोजी शासकीय अंत्यविधीचे आयोजन करण्यात आले होते, परंतु युद्धामुळे ते पुढे ढकलण्यात आले. इराण सरकार आणि स्थानिक प्रशासनाने अंत्यविधीच्या नवीन तारखा जाहीर केल्यानंतर, देशभरात तयारी वेगाने झाली आहे. तेहरानपासून मशहदपर्यंत होणाऱ्या या घटनांकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. हा कार्यक्रम इराणच्या इतिहासातील सर्वात मोठ्या सार्वजनिक श्रद्धांजलींपैकी एक मानला जातो.