
2011मध्ये नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री होते. त्यावेळी त्यांनी केंद्रातील मनमोहन सिंग यांच्या सरकारविरोधात युद्ध पुकारण्याची भाषा वापरली होती.
तामीळनाडूचे भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि माजी आयपीएस अधिकारी के. अण्णामलाई यांनी केंद्रातील मोदी सरकारवर हल्ला केला. दिल्लीत आंदोलन करणाऱया कॉक्रोच जनता पार्टीच्या नेत्यांना प्रतिबंधात्मक कारवाईसाठी अवैधरीत्या ताब्यात घेणे चुकीचे होते, असे सांगत केंद्र सरकारला प्रश्न विचारणाऱ्यांना त्याचे उत्तर देण्याऐवजी विदेशी हस्तक असल्याचे संबोधले जात आहे, असा आरोप अण्णामलाई यांनी केला. 2011मध्ये नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री होते. त्यावेळी त्यांनी केंद्रातील मनमोहन सिंग यांच्या सरकारविरोधात युद्ध पुकारण्याची भाषा वापरली होती, अशी आठवणही त्यांनी करून दिली.
पंतप्रधान मोदींच्या पूर्वीच्या विधानाचा दाखला के. अण्णामलाई यांनी ‘एक्स’ पोस्टमध्ये दिला आहे. ते म्हणाले की, 2011 मध्ये मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांनी म्हटले होते की, जर त्यांचे हात बांधलेले नसते तर ते दिल्लीला जाऊन केंद्र सरकारविरोधात युद्ध पुकारले असते. तेव्हा दिल्लीतील रामलीला मैदानावर भ्रष्टाचाराविरोधात शांततापूर्ण पद्धतीने चाललेल्या आंदोलनावर दिल्ली पोलिसांनी कारवाई केली होती. यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री मोदी यांनी हे विधान केले होते. माझ्या मते पंतप्रधान मोदी त्यावेळी योग्यच म्हणाले होते. त्यात काहीही चुकीचे नव्हते, असे अण्णामलाई म्हणाले. देशात आज जी परिस्थिती आहे ती वेगळी नाही. तुम्ही जर सरकारला प्रश्न विचारले तर तुम्हाला अनिश्चित काळासाठी तुरुंगात टाकले जाऊ शकते, तुमचा जामीन नाकारला जाऊ शकतो. आश्चर्याची गोष्ट म्हणजे प्रतिबंधात्मक जामीन प्रकरणे हाताळणारे विशेष कार्यकारी दंडाधिकारी तुम्हाला मात देऊ शकतात. कायद्याच्या प्रक्रियेवर प्रश्न विचारल्यास तुम्हाला शिवीगाळ होऊ शकते, अशी टीकाही त्यांनी केली.
भाजपला सोयीनुसार विसरण्याची सवय
मला भाजपमधील काही लोकांना एक गोष्ट स्पष्टपणे सांगायची आहे. तुम्हाला सोयीनुसार विस्मृतीत जाण्याची सवय आहे. पण हे विसरू नका की, मी 5 जून 2026 ला पक्षातून बाहेर पडलो. मी पत्रकार परिषदेत सांगितल्याप्रमाणे, सीजेपीच्या आंदोलनाच्या पद्धतीशी सहमत नाही आणि त्यांच्या अनेक धारणा दिशाहीन आहेत. पण असे असले तरी त्यांना त्यांच्या मुद्दय़ावर आंदोलन करण्याचा, सरकारला प्रश्न विचारण्याचा अधिकार नक्कीच आहे, अशा शब्दांत अण्णामलाई यांनी भाजपला सुनावले.


























































