क्रिकेटचा वेडेपणा कामी आला अन् तिसऱ्या मजल्यावरून कोसळलेल्या चिमुकलीचा तरुणाने जीव वाचवला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

क्रिकेटची आवड एखाद्या व्यक्तीचा जीव वाचवू शकते, असा विचार कोणीही केला नसेल. पण लंडनमध्ये एका हिंदुस्थानी तरुणाने आपल्या क्रिकेट कौशल्याच्या मदतीने एका चिमुकलीचा जीव वाचवला आहे. लंडनच्या इलफोर्ड भागात एका इमारतीच्या खिडकीच्या कडेवरून खाली कोसळणाऱ्या तीन वर्षांच्या चिमुकलीला जीवनदान मिळाले आहे. ‘द मेट्रो’ या वृत्तसंस्थेने याबाबतचे वृत्त दिले आहे.

‘इंडिया टुडे’ने दिलेल्या वृत्तानुसार, मंगळवारी दुपारच्या सुमारास इलफोर्ड हाय रोडवरील एका दुकानाच्या वर असलेल्या फ्लॅटच्या खिडकीबाहेर ही चिमुरडी अत्यंत धोकादायक पद्धतीने लटकत असल्याचे लोकांच्या निदर्शनास आले. घटनेची माहिती मिळताच आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी पोहोचली. तब्बल 9 मिनिटांहून अधिक काळ ती चिमुरडी तिथे लटकत होती. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये खाली उभे असलेले लोक रेस्क्यू टीमला मुलीला वाचवण्यासाठी विनंती करत होते. एका बाजूला एक महिला खालच्या खिडकीतून मुलीला पकडण्याचा प्रयत्न करत होती, तर एक पोलीस अधिकारी खाली सुरक्षा भिंतीवर उभा होता; पण त्याचा हात मुलीपर्यंत पोहोचत नव्हता.

बराच वेळ मुलगी खिडकीला लटकून असल्यामुळे तिच्या हाताची पकड हळूहळू सुटत होती. मुलीची पकड सुटत असल्याचे पाहून तिथे उपस्थित असलेला मोहम्मद जेसिल हा हिंदुस्थानी तरुण मदतीसाठी पुढे सरसावला. यावेळी पोलीस आणि मोहम्मद दोघेही मुलीला वाचवण्याचा प्रयत्न करत होते. इतक्यात तिचा हात सुटला आणि ती खाली कोसळली. तेवढ्यात मोहम्मदने अत्यंत चपळाईने तिला हवेतच झेलले (कॅच घेतला) आणि पोलीस अधिकाऱ्याने दोघांनाही सांभाळले. मुलगी सुखरूप हाती येताच प्रत्यक्षदर्शींनी टाळ्या वाजवून आणि जल्लोष करत या दोघांचे आभार मानले.

जेसिल हा स्वतः पाच महिन्यांच्या जुळ्या मुलांचा पिता आहे. जेसिलने सांगितले, “मी कोणताही विचार न करता केवळ एका बापाच्या भावनेतून पुढे धावलो. मी कोणताही हिरो नाही, पण एका लहान मुलीला संकटात पाहून माझ्यातील वडिलांचे कर्तव्य जागे झाले आणि मी मदत केली. मी या चिमुकलीला वाचवू शकलो याचा मला आनंद आहे. ती काही बोलली नाही, तिने फक्त मला घट्ट मिठी मारली. खरं तर मी हिंदुस्थानात क्रिकेट खेळायचो, त्यामुळे कदाचित अशा कठीण प्रसंगात मी तिला वाचवू शकलो, असे मोहम्मद म्हणाला.

या घटनेनंतर मुलीच्या वडिलांनी जेसिल आणि त्या पोलीस अधिकाऱ्याचे आभार मानत त्यांना ‘रिअल हिरो’ म्हटले आहे. “ते दोघेही आमच्यासाठी देवदूत ठरले. त्यांच्यामुळेच आज माझी मुलगी सुखरूप आहे,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली. दरम्यान, मुलगी एवढा वेळ तिथे कशी लटकत राहिली, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.