चिमूर तालुक्यात वीज कोसळून शेतकऱ्याचा मृत्यू; बैल गोठ्यात बांधायला गेले अन् काळाने गाठले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बैल गोठ्यात बांधण्यासाठी गेलेल्या एकाय शेतकऱ्याचा अंगावर वीज कोसळून जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना चिमूर तालुक्यातील खापरी (डोमा) गावात घडली. रनभीड रामाजी रामटेके (वय – 48) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. या घटनेमुळे खापरी गावासह संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास चिमूर परिसरात अचानक वातावरणात बदल झाला. जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस आणि विजांचा कडकडाट सुरू झाला. पाऊस सुरू झाल्याने रनभीड रामटेके हे घराजवळ बांधलेले बैल सुरक्षितपणे गोठ्यात बांधण्यासाठी गेले होते. नेमक्या याच वेळी त्यांच्या अंगावर थेट वीज कोसळली. विजेचा धक्का इतका तीव्र होता की, रनभीड यांचा जागीच मृत्यू झाला.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच परिसरातील गावकऱ्यांनी घटनास्थळी एकच गर्दी केली. कुटुंबाचा आधार हिरावल्याने रामटेके कुटुंबासह संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. या घटनेची माहिती मिळताच भिसी पोलिसांनी तातडीने पावले उचलली आहेत. पोलिसांनी घटनेची नोंद केली असून, पुढील कायदेशीर कार्यवाही आणि तपास सुरू आहे.