
देशपातळीवर ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वातील तृणमूल काँग्रेसचे काँग्रेस पक्षात विलीनीकरण होणार असल्याची चर्चा आहे. त्यातच महाराष्ट्रात महाविकास आघाडीतील एक प्रमुख पक्ष असणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काँग्रेसमध्ये विलीनीकरण होणार असल्याचे बोलले जात आहे. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनीच याबाबतचा प्रस्ताव दिला असल्याचा दावा काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केला आहे. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
सध्या देशात राजकीय पक्षांच्या विलीनीकरणापेक्षा महागाई, बेरोजगारी आणि नीट परीक्षेचा गोंधळ या सारखे विषय अधिक महत्त्वाचे आहेत. आमची पक्षाच्या विलीनीकरणाबाबत कधीही कोणतीही चर्चा झालेली नाही आणि तसा कोणताही प्रस्ताव आमच्यासमोर आलेला नाही, असे स्पष्ट मत सुप्रिया सुळे यांनी नागपूर येथे पत्रकारांशी संवाद साधताना व्यक्त केले.
काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या संभाव्य विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम देत सुप्रिया सुळे म्हणाल्या, “या संदर्भात आम्हाला कोणीही संपर्क साधलेला नाही. राजकीय क्षेत्रातील नेते वेगवेगळ्या कामांनिमित्त एकमेकांना भेटत असतात. सोनिया गांधी आणि ममता बॅनर्जी यांच्या भेटीत नक्की काय चर्चा झाली, याबाबत मला कोणतीही माहिती नाही. तसेच कोण कोणाच्या संपर्कात आहे, हेही मला माहीत नाही. शरद पवारांकडे असा कोणताही प्रस्ताव आलेला नाही आणि त्यांनीही कोणाला असा प्रस्ताव दिलेला नाही.”
राष्ट्रवादीचे काँग्रेसमध्ये विलीनीकरण होणार? शरद पवारांनीच प्रस्ताव दिल्याचा पटोले यांचा दावा
आता राजकारण करण्याची नव्हे, देश वाचवण्याची वेळ
देशाच्या सद्यस्थितीवर चिंता व्यक्त करताना त्या म्हणाल्या की, सध्या देशाची सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती कमालीची खालावली आहे. त्यामुळे आता एकमेकांवर चिखलफेक करत राजकारण बसण्याची ही वेळ नसून, देश वाचवण्याची वेळ आली आहे. सत्ताधारी आणि विरोधकांनी केवळ ‘तू तू मै मै’ करत बसायचे की महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचारामुळे अडचणीत आलेल्या शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांना आधार द्यायचा, याचा विचार केला पाहिजे. जनतेने आमच्यावर विश्वास दाखवून धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी निवडून दिले आहे. ‘घर फोडा, पक्ष फोडा’ असले उद्योग आम्ही कधीही केलेले नाहीत आणि करणारही नाही, असा टोला त्यांनी सत्ताधाऱ्यांना लगावला.
रोहित पवारांच्या आंदोलनावर अभिमान
रोहित पवार यांच्या आंदोलनाचा उल्लेख करत सुप्रिया सुळे म्हणाल्या, “सध्याचे सरकार अत्यंत असंवेदनशील आहे. त्यामुळे मी रोहितला सुरुवातीपासूनच उपोषण न करण्याची विनंती करत होते, कारण ही लढाई मोठी असून आपल्याला आपली ताकद टिकवून ठेवायची आहे. मात्र, शेतकऱ्यांविषयी असलेल्या आस्था आणि प्रेमापोटी त्याने उपोषण करण्याचा निर्णय घेतला. काल रात्रीही माझे त्यांच्याशी बोलणे झाले होते. प्रचंड उन्हाळा असतानाही गेली 24 तास त्यांनी अन्न ग्रहण केलेले नाही. शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी रोहित इतका मोठा लढा उभा करत आहे, याचा मला सार्थ अभिमान आहे.”
नियम, अटी न लावता शेतकऱयांना सरसकट कर्जमाफी द्या; रोहित पवार यांचे पंढरपुरात अन्नत्याग आंदोलन सुरू


























































