शारजाहहून कोझिकोडकडे जाणाऱ्या एअर अरेबियाच्या विमानात तांत्रिक बिघाड, कोचीमध्ये आपत्कालीन लँडिंग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शारजाहहून कोझिकोडकडे जाणारे एअर अरेबियाचे विमान तांत्रिक बिघाडामुळे शनिवारी पहाटे कोचीकडे वळवण्यात आले. कोची आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमान सुरक्षितपणे उतरवण्यात आले. बिघाड दुरुस्त केल्यानंतर विमान पुढील प्रवासासाठी रवाना झाले. या विमानत 170 प्रवासी आणि कर्मचारी होते. सर्वजण सुरक्षित आहेत.

द टेलिग्राफने दिलेल्या वृत्तानुसार, विमानातील इंजिन रिव्हर्स थ्रस्ट सिस्टीमशी संबंधित समस्येमुळे एअर अरेबियाचे विमान G9 454 कोचीकडे वळवण्यात आले, असे कोचीन इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड (CIAL) च्या प्रवक्त्याने सांगितले. सुरक्षा मानकांचे पालन करत कोची विमानतळ प्रशासनाने पहाटे 3.19 वाजता ‘लोकल स्टँडबाय’ जाहीर केला. त्यानंतर आपत्कालीन सेवा सज्ज असल्याची खात्री करण्यासाठी पहाटे 3.34 वाजता ही स्थिती पूर्ण आणीबाणी (full emergency) पर्यंत वाढवली.

पहाटे 3.38 वाजता विमान सुरक्षितपणे उतरले. त्यानंतर विमान पार्किंग बे कडे नेण्यात आले. सर्व सुरक्षा तपासण्या पूर्ण झाल्यानंतर पहाटे 3.45 वाजता पूर्ण आणीबाणीची स्थिती मागे घेण्यात आली, असे प्रवक्त्याने सांगितले. त्यानंतर तांत्रिक बिघाड दुरुस्त केल्यानंतर सकाळी 7.15 वाजता विमान कोचीहून कोझिकोडसाठी रवाना झाले.