
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील संगमेश्वर येथील सोनवी पुलाचे काम सध्या सुरू असतानाच या मार्गावरून वाहतूक सुरू करण्यात आल्याने वाहनचालक आणि स्थानिक नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. पुलावरील वाहतूक सुरू आहे की बंद, याबाबत कोणतेही अधिकृत सूचना फलक किंवा दिशादर्शक चिन्हे नसल्याने नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील चौपदरीकरण प्रकल्पांतर्गत सोनवी पुलाचे काम गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असून तब्बल 17 वर्षांनंतरही ते पूर्ण झालेले नाही. वाहतूक कोंडीची समस्या लक्षात घेत पुलाचे काम वेगाने सुरू करण्यात आले असले, तरी अद्याप काम अपूर्ण अवस्थेत असल्याचे दिसून येत आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना वारंवार जोडरस्ते तयार करण्याची मागणी करण्यात आली आहे. मात्र या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. सध्या काही काळ पुलावरून वाहतूक सुरू ठेवली जाते, तर काही वेळा कोणतीही पूर्वसूचना न देता रस्ता बंद केला जात असल्याने वाहन चालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. पुलाचे काम पूर्ण झालेले नसताना आणि वाहतुकीबाबत कोणतेही अधिकृत फलक लावण्यात आलेले नसताना या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनांच्या सुरक्षिततेची जबाबदारी नेमकी कोणाची, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
संभाव्य अपघातांचा धोका लक्षात घेता संबंधित यंत्रणांनी तातडीने स्पष्ट सूचना फलक उभारावेत, जोडरस्त्यांची व्यवस्था करावी आणि सोनवी पुलाचे उर्वरित काम युद्धपातळीवर पूर्ण करून नियमित वाहतूक सुरू करावी, अशी मागणी स्थानिक नागरिक व वाहनचालकांकडून करण्यात येत आहे.




























































