प्रासंगिक – वगसम्राट दादू इंदुरीकर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> प्रा. डॉ. प्रकाश खांडगे

आजही ‘गाढवाचं लग्न’ हे नाव निघालं की, डोळ्यांसमोर उभा राहतो तो दादोबांचा विलोभनीय चेहरा, त्यांची सहज अंगभूत देहबोली आणि डोळ्यांच्या हालचालीतून प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याची अफाट किमया! दादू इंदुरीकर हे केवळ एक वगसम्राट नव्हते, तर ते मराठी लोकरंगभूमीवरील खऱ्या अर्थाने एक महानायक होते. विख्यात लेखक पु. ल. देशपांडे यांनी दादोबांचा गौरव ‘महाराष्ट्राचा पॉल मुनी’ असा केला होता. पुणे जिह्यातील इंदुरी हे दादोबांचे मूळ गाव. त्यांचे वडील राघोबा सरोदे (इंदुरीकर) यांच्याकडे ढोलकी फडाच्या तमाशाची मोठी परंपरा होती. त्यामुळे तमाशाचे बाळकडू दादोबांना घरातूनच मिळाले होते.

मराठी तमाशाच्या परंपरेचा विचार केला तर त्याला संत आणि शाहिरी (तंत) परंपरेचे मोठे अधिष्ठान लाभले आहे. उमा-बाबू सावळजकर यांनी 1853 मध्ये ‘मोहना बटाव’ या वगाद्वारे ढोलकी फडाच्या तमाशात आख्यानकाव्याची सुरुवात केली. दलित आणि बहुजन समाजातील कलावंतांनी आपल्या उपजत गायन-वादनाच्या कौशल्याने ही लोककला जिवंत ठेवली. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात याच परंपरेला आधुनिक रूप देत पांढरपेशा वर्गाच्या दिवाणखान्यापर्यंत पोहोचवण्याचे ऐतिहासिक काम दादू इंदुरीकरांनी केले. दादोबांच्या आयुष्यात अनेक चढ-उतार आले. ‘न्यू हनुमान थिएटर’ आणि ‘न्यू जसराज थिएटर’च्या मांडवातून बाहेर पडल्यानंतरचा काळ त्यांच्यासाठी अत्यंत संघर्षाचा होता. काही काळ तर त्यांनी कापड गिरणीत धोटय़ावर कामगार म्हणूनही दिवस काढले. मात्र नंतर शाहीर मधू कडू यांच्या साथीने ‘गणेश थिएटर’चा नवा प्रपंच सुरू झाला आणि दादोबांचा रंगभूमीवर खऱ्या अर्थाने ‘पुनर्जन्म’ झाला. प्रभादेवीच्या रवींद्र नाटय़ मंदिरमध्ये कोसळणाऱया पावसाच्या साक्षीनं ‘गाढवाचं लग्न’चा प्रयोग जेव्हा हाऊसफुल्ल झाला, तो क्षण दादोबांच्या कीर्तीची नवी पहाट ठरला. हरी वडगावकर रचित ‘चित्रसेन गंधर्वाची कथा अर्थात गाढवाचं लग्न’ या वगातील ‘सावळ्या कुंभार’ दादोबांनी आपल्या अमोघ विनोदाने अजरामर केला. या वगातील संवाद मराठी माणसाच्या मनावर आजही कोरलेले आहेत. सावळ्या कुंभार आणि गंगीमधील संवाद असो किंवा स्वर्गातील प्रवेशाच्या वेळी साधू महाराजांसोबत केलेली कोटी असो, प्रासंगिक, साधे आणि खुसखुशीत संवाद आजही प्रेक्षकांना खळाळून हसवतात. 7 ऑगस्ट 1972 रोजी दादोबांना भारत सरकारचा प्रतिष्ठत ‘संगीत नाटक अकादमी पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. यामुळे त्यांची कीर्ती देशभर पसरली. निळू फुले, राम नगरकर यांच्यासारखे समकालीन दिग्गजही दादोबांच्या अभिनयाचे चाहते होते. निळूभाऊंनी एका आठवणीत म्हटले होते की, तमाशाच्या क्षेत्रात नोटांनी भरलेली पोती फक्त दोनच कलावंतांच्या प्रयोगाला पाहिली- एक दादू इंदुरीकर आणि दुसऱ्या विठाबाई नारायणगावकर! मात्र नियतीचा खेळ असा की, अमाप कीर्ती मिळूनही दादोबांच्या सदऱयाचा खिसा कायम रिकामाच राहिला.

हा अवलिया कलावंत स्वभावाने कमालीचा ऋजू आणि कृतज्ञ होता. प्रयोगाच्या आधी भीषण अपघात होऊन नाक फुटलेले आणि हातपाय दुखावलेले असतानाही केवळ दिलेल्या शब्दासाठी दादोबांनी वेदना सहन करत प्रयोग सादर केला व हाऊसफुल्ल गर्दीला हसवलं. त्यांच्या पश्चात त्यांचा मुलगा गणेश आणि नंतर राजेंद्र यांनी ही कलेची परंपरा पुढे चालवली. दादरच्या मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या पायऱ्यांवर झालेली त्यांची शेवटची भावूक भेट आणि ‘गुरुजी ही आपली शेवटची भेट…’ हे त्यांचे शब्द आजही मनाला चटका लावून जातात. 13 जून 1980 रोजी हा महान वगसम्राट अनंतात विलीन झाला, पण लोकरंगभूमीच्या इतिहासात सावळ्या कुंभाराच्या रूपाने ते आजही अढळ पदावर विराजमान आहेत.