
जयगड प्रादेशिक नळपाणी योजनेत काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांची आर्थिक पिळवणूक सुरू आहे. या योजनेत १४ कंत्राटी कामगार काम करत असतात त्यांची कोणतीही नोंद नसल्याचा खळबळजनक आरोप खंडाळा पंचक्रोशी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष प्रथमेश गावणकर यांनी केला आहे. दहा वर्ष काम करूनही कंत्राटी कामगारांना १० ते १२ हजार रूपये असा तुटपुंजा पगार मिळतो. याविरोधात २२ जून पासून उपविभागीय कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन छेडणार असल्याचा इशारा प्रथमेश गावणकर यांनी दिला आहे.
प्रथमेश गावणकर यांनी सांगितले की, याबाबत दोन वेळा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट घेतली होती. त्याबैठकीत कारवाई करण्याचा लेखी आदेश देऊनही संबंधित विभागाने कोणतीही कारवाई केलेली नाही.आज जयगड प्रादेशिक नळपाणी योजनेवर १४ ग्रामपंचायती अवलंबून आहेत. या योजनेत काम करणाऱ्या १४ कामगारांची हजेरी नोंदवही नसल्याचे प्रथमेश गावणकर यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार सर्व सुविधा कंत्राटदाराला दिल्या जातात परंतु त्या कामगारांपर्यत पोहोचत नसल्याचा आरोप प्रथमेश गावणकर यांनी केला आहे. योजनेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना रात्री-अपरात्री पाण्याच्या टाकीवर जावे लागते.पाण्याच्या टाक्या जंगलात आहेत. काम करताना त्यांचा वीजेशी संपर्क येतो अशावेळी त्या कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो त्याकरिता आरोग्य विम्याची तरतूद करावी, अशी मागणी प्रथमेश गावणकर यांनी केली आहे.




























































