करवीर निवासिनी श्रीअंबाबाई मंदिराच्या मुख्य शिखरास सुवर्ण झळाळी; लवकरच कलशारोहण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मूळ तांब्याचा २०० किलो वजन आणि तेरा फूट उंच सोन्याचा मुलामा असलेला कळस आज साडेतीन शक्तिपीठांपैकी एक संपूर्ण पीठ असलेल्या करवीर निवासिनी श्रीअंबाबाई मंदिराच्या मुख्य शिखरावर विधिवत बसविण्यात आला.गोव्याचे माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे कुटुंबीयांकडुन श्रद्धेपोटी अडिच ते तीन कोटींचे तब्बल दीड किलो सोन्याचा वापर करून हा कळस अपर्ण करण्यात आला होता.

एक भक्त म्हणून प्रतापसिंह राणे यांनी करवीर निवासिनी श्रीअंबाबाई मंदिराला सोन्याचा कळस बसवण्याचा मानस करुन,अवघ्या दोन महिन्यात पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीसह सर्व संबंधित विभागाची परवानगी घेऊन हा कळस बनवून घेतला.मूळ ४०० किलोचा कळस आणि डेरा, त्यावर अडीच किलोचा सोन्याचा पत्रा लावून हा कळस बनवण्यात आला आहे.काल गुरुवारी रात्री कळस आणि इतर साहित्य मंदिर आवारात आणण्यात आले. बाहेरून आणलेले १० आणि स्थानिक १५ कर्मचारी,क्रेन यांच्या सहाय्याने कळस बसविण्याचे मध्यरात्री दिड च्या सुमारास सुरु झालेले काम सकाळी साडेसात पर्यंत पूर्ण झाले.सध्या श्रीअंबाबाई मंदिर विकास आराखड्या नुसार कामे सुरु असल्याने कलशारोहणाचा कोणताही सोहळा वा धार्मिक विधी न करता,कळस बसवण्याचे काम पूर्ण केले असून सर्व कामे पूर्ण झाल्यानंतर विधिवत सोहळा केला जाईल असे सचिव शिवराज नायकवडी यांनी सांगितले.

अधिक मास आणि शुक्रवार असा दुहेरी योग आज जुळून आल्याने मंदिराच्या मुख्य शिखरावर हा सोन्याचा कळस बसवण्यात आला.हा कळस पाहण्यासाठी भाविकांनी दिवसभर मंदिर परिसरात गर्दी केली होती.सध्या मंदिरात गरुड मंडप,मणिकर्णिका कुंड पुनर्जीवित करण्याच्या कामासह विविध कामे सुरू आहेत.