सोशल मीडियावरील खाद्य पदार्थांच्या तक्रारींची FSSAI कडून गंभीर दखल; नेस्ले, KFC सह फ्लिपकार्टलाही बजावली नोटीस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सोशल मीडियावरून सातत्याने मिळणाऱ्या अन्नपदार्थांमधील त्रुटी आणि अस्वच्छतेच्या तक्रारींची दखल घेत भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (FSSAI) मोठे पाऊल उचलले आहे. खाद्य पदार्थांमध्ये कीटक आढळणे आणि स्वच्छतेचे नियम न पाळल्याप्रकरणी FSSAI ने नेस्ले, फ्लिपकार्ट आणि केएफसी (KFC) सारख्या दिग्गज कंपन्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. तसेच या संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

FSSAI आता सोशल मीडियावरील ग्राहकांच्या तक्रारींवर अत्यंत बारकाईने लक्ष ठेवून आहे. या प्रकरणांच्या चौकशीत जर कंपन्या दोषी आढळल्या तर, अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे FSSAI अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

‘मॅगी पॅकेटमध्ये कीडे; नेस्लेकडून मागवला अहवाल

सोशल मीडियावर एका ग्राहकाने ‘मॅगी’च्या पाकिटात कीटक आणि अळ्या आढळल्याची तक्रार केली होती. या गंभीर प्रकारानंतर FSSAI ने नेस्ले कंपनीला नोटीस बजावली आहे. प्राधिकरणाने कंपनीकडे संबंधित बॅचचा स्रोत, पुरवठादाराची माहिती आणि अंतर्गत गुणवत्ता तपासणी अहवाल मागितला आहे. यासोबतच, असे खराब उत्पादन बाजारातून आणि सप्लाय चेनमधून तातडीने हटवण्यासाठी काय उपाययोजना केल्या, तसेच भविष्यात अशा घटना घडू नयेत म्हणून काय खबरदारी घेतली जाणार, याचे सविस्तर स्पष्टीकरण मागवले आहे.

फ्लिपकार्टवरून मागवलेल्या खजूरमध्ये आढळले कीडे

दुसऱ्या एका प्रकरणात, ‘फ्लिपकार्ट मिनिट्स’ (Flipkart Minutes) वरून मागवलेल्या ‘खजूराच्या पाकिटात या उत्पादनात कीटक आढळल्याची तक्रार सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. या तक्रारीची दखल घेत FSSAI ने फ्लिपकार्ट आणि ओपन सीक्रेट या दोन्ही कंपन्यांना नोटीस पाठवली आहे. या प्रकरणातील गुणवत्ता तपासणी अहवाल आणि तक्रार प्राप्त झाल्यानंतर कंपन्यांनी काय कारवाई केली, याचा अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

आंध्र प्रदेशातील KFC आउटलेटला स्वच्छतेवरून दणका

आंध्र प्रदेशातील एलुरु येथील ‘एमव्हीआर मॉल’मध्ये असलेल्या केएफसी (KFC) स्टोअरमध्ये स्वच्छतेचा पुरता बोजा उडाल्याची तक्रार समोर आली होती. यावर कडक कारवाई करत FSSAI ने केएफसीला नोटीस बजावली आहे. प्राधिकरणाने संबंधित फूड बिझनेस ऑपरेटरकडे स्वच्छता, सॅनिटेशन, खाद्यपदार्थांची हाताळणी, साठवणूक, कचरा व्यवस्थापन, पेस्ट कंट्रोल आणि कर्मचाऱ्यांची वैयक्तिक स्वच्छता या सर्व बाबींचा संपूर्ण तपशील मागवला आहे. तसेच, त्रुटी सुधारण्यासाठी केलेल्या कारवाईचे कायदेशीर पुरावे सादर करण्यास सांगितले आहे.