सावधान, वाहने सावकाश चालवा! रस्ते अपघातांतील मृत्यूंमध्ये 2.5 टक्क्यांची वाढ, ‘हिट अँड रन’ मृत्यूंमध्ये 9 टक्क्यांची वाढ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानातील रस्ते अपघातांचे प्रमाण 2024 मध्ये आणखी वाढल्याचे समोर आले आहे. गेल्या वर्षभरात देशात झालेल्या रस्ते अपघातांमध्ये 1 लाख 77 हजार 175 जणांचा मृत्यू झाला असून 2023 च्या तुलनेत मृत्यूंमध्ये 2.5 टक्क्यांची वाढ झाली आहे. 2023 मध्ये रस्ते अपघातांमुळे 1 लाख 72 हजार 890 जणांचा मृत्यू झाला होता. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या (MoRTH) ‘रोड अॅक्सिडेंट्स इन इंडिया 2024’ या अहवालातून ही माहिती समोर आली आहे.

अहवालानुसार, 2024 मध्ये देशभरात 4 लाख 87 हजार 707 रस्ते अपघातांची नोंद झाली. 2023 च्या तुलनेत अपघातांच्या संख्येत 1.5 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 2014 ते 2023 या कालावधीत दरवर्षी सरासरी 1.54 लाख लोकांचा रस्ते अपघातांमध्ये मृत्यू होत होता. त्या तुलनेत 2024 मधील मृत्यूंचा आकडा लक्षणीयरीत्या जास्त असल्याचे दिसून आले आहे.

वाहनांची संख्या झपाट्याने वाढत असताना रस्ते सुरक्षेच्या उपाययोजना त्या वेगाने प्रभावी ठरत नसल्याचे चित्र या आकडेवारीतून स्पष्ट होते. 2014 मध्ये प्रति 10 हजार वाहनांमागे मृत्यूचे प्रमाण 7.3 टक्के इतके होते. ते 2022 मध्ये 4.8 टक्क्यांपर्यंत खाली आले असले तरी देशातील वाहनसंख्या 2014 मधील 19.1 कोटींवरून 2024 मध्ये 35.4 कोटींवर पोहोचली आहे. त्यामुळे एकूण मृत्यूंचा आकडा वाढतच आहे.

दिल्लीत सर्वाधिक अपघात

50 लाखहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये अपघाती मृत्यूंमध्ये केवळ 0.4 टक्क्यांची घट झाली असली तरी अनेक महानगरांतील परिस्थिती चिंताजनकच आहे. देशाची राजधानी दिल्ली येथे 2024 मध्ये सर्वाधिक 5,657 अपघात, 1,551 मृत्यू आणि 5,224 जखमींची नोंद झाली. पादचारी मार्गांवरील अपघातांमध्येही दिल्ली आघाडीवर असून 147 पादचाऱ्यांचा मृत्यू झाला.

बंगळुरू शहर अपघात आणि मृत्यूंच्या बाबतीत देशात दुसऱ्या क्रमांकावर राहिले. तेथे 4,769 अपघातांमध्ये 894 जणांचा मृत्यू झाला. दुसरीकडे अहमदाबादमध्ये मृत्यूंच्या संख्येत 125 ने घट झाली, तर धनबादमध्ये 95 आणि कानपूरमध्ये 78 मृत्यू कमी झाले.

‘हिट अँड रन’ घटनांनी वाढवली चिंता

2024 मध्ये ‘हिट अँड रन’ प्रकारातील अपघातांमधील मृत्यूंमध्ये सर्वाधिक वाढ झाली आहे. अशा घटनांमध्ये मृत्यूंची संख्या वर्षभरात 9 टक्क्यांनी वाढून 34,030 वर पोहोचली. देशातील एकूण रस्ते अपघाती मृत्यूंपैकी तब्बल 19.2 टक्के मृत्यू ‘हिट अँड रन’ प्रकरणांमुळे झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

तज्ज्ञांच्या मते, वाढती वाहनसंख्या, वेगमर्यादांचे उल्लंघन, वाहतूक नियमांकडे होणारे दुर्लक्ष आणि पादचाऱ्यांसाठी सुरक्षित सुविधांचा अभाव यामुळे रस्ते अपघातांचे प्रमाण कमी होत नसल्याचे दिसून येते. त्यामुळे रस्ते सुरक्षेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना आणि कठोर अंमलबजावणीची गरज असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे.