
चिपळूण शहरातील रिलायन्स स्मार्ट बाजारासमोरील रस्त्यावर मालवाहू कंटेनर रस्त्याच्या मधोमध आडवा फसल्याने शुक्रवारी दुपारी वाहतुकीची मोठी कोंडी निर्माण झाली. या घटनेमुळे इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र ते चिपळूण नगरपालिका या शहरातील महत्त्वाच्या मार्गावरील वाहतूक तासभराहून अधिक काळ ठप्प झाली.
कंटेनर रस्त्यात अडकल्याने दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. शालेय विद्यार्थी, नोकरदार, व्यावसायिक तसेच सर्वसामान्य नागरिकांना याचा मोठा फटका बसला. अनेक वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करावा लागला.
घटनेची माहिती मिळताच वाहतूक सुरळीत करण्यासाठी संबंधित यंत्रणा आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र कंटेनर रस्त्याच्या मध्यभागी आडवा झाल्याने वाहतूक पूर्ववत करण्यासाठी काही काळ लागला. दरम्यान, वाहतूक कोंडीमुळे नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत असून अशा प्रकारच्या जड वाहनांच्या शहरातील वर्दळीच्या मार्गावरील हालचालींबाबत योग्य नियोजन करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.





























































