
नुवामा प्रायव्हेट टी-२० मुंबई लीग २०२६ चा शानदार समारोप शनिवारी वानखेडे स्टेडियमवर होत आहे. या क्रिकेट उत्सवात पुरुषांच्या अंतिम सामन्यासोबतच महिला लीगचा पहिलावहिला ऐतिहासिक अंतिम सामनाही खेळवला जाणार आहे. गतविजेता ‘मुंबई साउथ सेंट्रल मराठा रॉयल्स’ संघ आपले जेतेपद राखण्यासाठी ‘आर्क्स अंधेरी’शी भिडणार आहे.
शिवम दुबेच्या नेतृत्वाखालील ‘अंधेरी’ने आकाश टायगर्सचा पाच विकेट्सने, तर सिद्धेश लाडच्या ‘रॉयल्स’ने अजिंक्य रहाणेच्या नॉर्थ मुंबई पँथर्सचा तीन विकेट्सने पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली आहे. दुबेचे आक्रमक नेतृत्व आणि लाडची रणनीती यातील चुरस प्रेक्षकांसाठी उत्सुकतेची ठरेल.
फाल्कन्स विरुद्ध टायगर्स
महिलांच्या पहिल्यावहिल्या विजेतेपदासाठी सायली सतघरेच्या नेतृत्वाखालील ‘सोबो मुंबई फाल्कन्स’ आणि हुमैरा काझीच्या ‘आकाश टायगर्स मुंबई वेस्टर्न सबर्ब्स’ यांच्यात लढत होईल. ‘टायगर्स’कडे सानिका चाळके (२०५ धावा) हिच्यासह मजबूत फलंदाजी आहे, तर ‘फाल्कन्स’ची ताकद कर्णधार सायलीच्या (९ बळी) धारदार गोलंदाजीवर अवलंबून आहे.
महिलांचा सामना – दुपारी १:०० वाजता
पुरुषांचा सामना – सायंकाळी ७:०० वाजता




























































