आखातात सागरी मार्गांवरील तणाव वाढला, 18 हजार हिंदुस्थानी खलाशी हाय अलर्टवर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मध्य पूर्वेतील सागरी मार्गांवरील वाढता तणाव आणि व्यापारी जहाजांवर होत असलेल्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर हिंदुस्थान सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. होर्मुझ सामुद्रधुनी, ओमानचे आखात आणि पर्शियन आखात परिसरात कार्यरत असलेल्या जहाजांसाठी जहाजरानी महासंचालनालयाने (डीजी शिपिंग) नवीन आणि कडक सागरी सुरक्षा मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. या सुरक्षा इशाऱ्यामुळे आखाती प्रदेशात कार्यरत असलेले 18 हजारांहून अधिक हिंदुस्थानी खलाशी हाय अलर्टवर आले आहेत.

इराणलगतचा समुद्री परिसर, पर्शियन आखात, होर्मुझ सामुद्रधुनी आणि आसपासच्या समुद्री क्षेत्रात कार्यरत असलेल्या हिंदुस्थानी जहाजे तसेच हिंदुस्थानी खलाशांसाठी ही सुरक्षा सूचना जारी करण्यात आली आहे. अलीकडे हिंदुस्थानी खलाशांचा समावेश असलेल्या व्यापारी जहाजांवर तीन मोठे हल्ले झाल्यानंतर केंद्र सरकारने ही भूमिका घेतली आहे.

ओमान किनाऱ्यावरील हल्ल्यानंतर वाढली चिंता

ओमानच्या किनाऱ्याजवळ नुकत्याच झालेल्या हल्ल्यात तीन हिंदुस्थानी खलाशांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर हिंदुस्थान सरकार अधिक सतर्क झाले आहे. हा समुद्री मार्ग जगातील सर्वाधिक वर्दळीच्या आणि महत्त्वाच्या मार्गांपैकी एक मानला जातो. जगभरात होणाऱ्या कच्च्या तेल आणि नैसर्गिक वायूच्या वाहतुकीतील मोठा हिस्सा याच मार्गाने जातो. या भागातील सुरक्षेची परिस्थिती बिघडल्यास केवळ हिंदुस्थानच नव्हे तर जागतिक अर्थव्यवस्थेलाही फटका बसू शकतो, अशी चिंता व्यक्त केली जात आहे.

622 हिंदुस्थानी खलाशी संवेदनशील भागात तैनात

सध्या होर्मुझ सामुद्रधुनीच्या पूर्व आणि पश्चिम टोकांवर असलेल्या 13 हिंदुस्थानी जहाजांवर सुमारे 622 हिंदुस्थानी खलाशी कार्यरत आहेत. याशिवाय संपूर्ण आखाती प्रदेशात विविध देशांच्या ध्वजाखाली चालणाऱ्या शेकडो व्यापारी जहाजांवर 18 हजारांहून अधिक हिंदुस्थानी खलाशी सेवा बजावत आहेत. त्यामुळे या सुरक्षा संकटाचा सर्वाधिक परिणाम हिंदुस्थानवर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

जहाजांसाठी कडक सुरक्षा उपाय

नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार सर्व जहाज चालक कंपन्या आणि कॅप्टन यांना जहाजांवर व्यापक सुरक्षा सराव करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जहाजांवरील ‘शिप सिक्युरिटी अलर्ट सिस्टीम’ (SSAS) कार्यरत असल्याची खात्री करण्यास तसेच ती कायम सुरू ठेवण्यास सांगण्यात आले आहे, जेणेकरून आपत्कालीन परिस्थितीत तातडीने मदत मिळू शकेल.

डीजी शिपिंगने खलाशांना आत्मघाती ड्रोन, लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे, लोइटरिंग म्युनिशन्स आणि ड्रोन बोट्ससारख्या आधुनिक धोक्यांबाबत विशेष सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. रात्रीच्या वेळी आणि संवेदनशील समुद्री भागातून प्रवास करताना अतिरिक्त सुरक्षा कर्मचारी तैनात करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

संशयास्पद हालचालींची तातडीने माहिती देण्याचे आदेश

समुद्रात कोणतीही संशयास्पद हालचाल, नौदलाच्या असामान्य हालचाली किंवा सुरक्षा धोका आढळल्यास तात्काळ हिंदुस्थानी अधिकाऱ्यांना माहिती देण्याचे निर्देश खलाशांना देण्यात आले आहेत. यासाठी ‘डीजीकॉम सेंटर’ आणि हिंदुस्थानी नौदलाचे ‘इन्फॉर्मेशन फ्युजन सेंटर – इंडियन ओशन रिजन’ (IFC-IOR) या संस्थांना प्रमुख समन्वय संस्था म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. या संस्था चोवीस तास समुद्री हालचालींवर नजर ठेवत आहेत.

जगभरात 3.2 लाख हिंदुस्थानी खलाशी

सध्या जगभरातील विविध जहाजांवर सुमारे 3.2 लाख भारतीय खलाशी कार्यरत आहेत. त्यामुळे व्यापारिक जहाजांची सुरक्षा हा हिंदुस्थानसाठी अत्यंत संवेदनशील आणि धोरणात्मक विषय बनला आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावरही हालचाली वाढल्या

व्यापारी जहाजांवरील हल्ले आणि हिंदुस्थानी नागरिकांच्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर हिंदुस्थानने आंतरराष्ट्रीय स्तरावरही सक्रिय भूमिका घेतली आहे. या भागातील सुरक्षेच्या प्रश्नावर अमेरिकेसह संबंधित देशांकडे तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली असून आखाती देश आणि विविध आंतरराष्ट्रीय सागरी सुरक्षा संस्थांशी समन्वय वाढविण्यात आला आहे. आखाती प्रदेशातील सुरक्षा परिस्थिती पूर्णपणे स्थिर होईपर्यंत हिंदुस्थानी जहाजे आणि 18 हजारांहून अधिक हिंदुस्थानी खलाशांनी सतर्क राहावे, असा स्पष्ट इशारा केंद्र सरकारने दिला आहे.