इराणसोबतचा करार म्हणजे बेईमानी, तेहरानकडून हिंदुस्थानी जहाजांवर ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न: डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या शांतता कराराच्या दाव्यांना फेक न्यूज ठरवत फेटाळून लावले आहे. ट्रम्प यांच्या या नवीन भूमिकेमुळे अमेरिका आणि इराण या दोन्ही देशांमधील युद्ध थांबण्याच्या शक्यता पुन्हा एकदा धोक्यात आली आहे. इराणच्या सरकारी माध्यमांनी शांतता करारासाठी ज्या अटी सांगितल्या आहेत, त्यांचा मूळ लेखी कराराशी कोणताही संबंध नसून इराणचे हे विधान लाजिरवाणे असल्याची टीका ट्रम्प यांनी Truth Social वर पोस्टद्वारे केली आहे.

या तणावाच्या पार्श्वभूमीवर, काल रात्री होर्मुझच्या सामुद्रधुनीतून प्रवास करणाऱ्या हिंदुस्थानी जहाजांवर इराणकडून ड्रोन हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याची माहितीही समोर आली आहे. मात्र हा हल्ला पूर्णपणे हाणून पाडण्यात आला, असे ते म्हणाले. ट्रम्प यांनी या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवला असून ही कृती पूर्णपणे अस्वीकार्य असल्याचे म्हटले आहे. इराणसोबत कोणताही व्यवहार करणे हे अत्यंत बेईमानीचे काम आहे आणि त्यांच्याशी कधीही प्रामाणिकपणे चर्चा होऊ शकत नाही, असे म्हणत इराणने लवकरात लवकर स्वतःच्या चुका सुधाराव्यात, असा इशारा त्यांनी दिला.

दरम्यान, सध्या या संभाव्य कराराबाबत दोन्ही देशांच्या दाव्यांमध्ये मोठी तफावत दिसून येत आहे. शुक्रवारी इराणच्या अधिकृत वृत्तसंस्थेने (IRNA) असा दावा केला होता की, युद्धादरम्यान अमेरिका आणि इस्रायलने केलेल्या हल्ल्यांमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई इराणला देण्याबाबत करारात तरतूद करण्यात आली आहे आणि यासाठी तिसऱ्या पक्षाकडून हमी मिळवण्यात आली आहे. दुसरीकडे गुरुवारी ट्रम्प यांनी पत्रकारांशी बोलताना युद्ध संपवण्यासाठी एक करार झाल्याचे सांगितले होते. मात्र तेहरानने अद्याप या प्रस्तावावर कोणताही अंतिम तोडगा निघाला नसल्याचे सांगितल्यामुळे सध्यातरी शांतता प्रस्थापित होण्याबाबत मोठा संभ्रम निर्माण झाला आहे.