मी इस्रायलचा पंतप्रधान असेपर्यंत इराणला अण्वस्त्रे बनवू देणार नाही – नेतन्याहू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जोपर्यंत मी इस्रायलचा पंतप्रधान आहे, तोपर्यंत इराणकडे अण्वस्त्रे नसतील, असे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू म्हणाले आहेत. X वर एक पोस्ट करत ते असे म्हणाले आहेत.

नेतन्याहू म्हणाले आहेत की, “या मुद्द्यावर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि माझ्यात पूर्ण सहमती आहे. त्यांनी तीन दशकांहून अधिक काळ इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमाविरुद्धच्या आंतरराष्ट्रीय लढ्याचे नेतृत्व केल्याचे नेतन्याहू यांचे म्हणणे आहे. ते म्हणाले, “जर हा संघर्ष नसता, तर इस्रायलला उद्ध्वस्त करण्यासाठी इराणने खूप आधीच अणुबॉम्ब मिळवला असता.” नेतन्याहू म्हणाले, “इराण ज्यू देशाला संपवण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्यांना तसे करण्यापासून रोखण्यासाठी मी माझे संपूर्ण जीवन समर्पित केले आहे. जोपर्यंत मी इस्रायलचा पंतप्रधान आहे, तोपर्यंत असे होणार नाही.”

दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या शांतता कराराच्या दाव्यांना फेक न्यूज ठरवत फेटाळून लावले आहे. ट्रम्प यांच्या या नवीन भूमिकेमुळे अमेरिका आणि इराण या दोन्ही देशांमधील युद्ध थांबण्याच्या शक्यता पुन्हा एकदा धोक्यात आली आहे. इराणच्या सरकारी माध्यमांनी शांतता करारासाठी ज्या अटी सांगितल्या आहेत, त्यांचा मूळ लेखी कराराशी कोणताही संबंध नसून इराणचे हे विधान लाजिरवाणे असल्याची टीका ट्रम्प यांनी केली आहे.

Truth Social एक पोस्ट करत ते म्हणाले आहेत की, या तणावाच्या पार्श्वभूमीवर, काल रात्री होर्मुझच्या सामुद्रधुनीतून प्रवास करणाऱ्या हिंदुस्थानी जहाजांवर इराणकडून ड्रोन हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याची माहितीही समोर आली आहे. मात्र हा हल्ला पूर्णपणे हाणून पाडण्यात आला. ट्रम्प यांनी या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवला असून ही कृती पूर्णपणे अस्वीकार्य असल्याचे म्हटले आहे. इराणसोबत कोणताही व्यवहार करणे हे अत्यंत बेईमानीचे काम आहे आणि त्यांच्याशी कधीही प्रामाणिकपणे चर्चा होऊ शकत नाही, असे म्हणत इराणने लवकरात लवकर स्वतःच्या चुका सुधाराव्यात, असा इशारा त्यांनी दिला.