मोबाईल नंबर ब्लॉक केल्याच्या रागातून तरुणीला भररस्त्यात लाथाबुक्क्यांनी मारहाण, तरुणाविरुद्ध गुन्हा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
crime news new

मोबाईल नंबर अनब्लॉक करण्यास आणि बोलण्यास नकार दिल्याचा राग अनावर झाल्याने एका 40 वर्षीय इसमाने तरुणीला रस्त्यात तरुणीला मारहाण केल्याची घटना चिपळूणमध्ये घडली. आरोपीने तरुणीला दगड आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या हल्ल्यात तरुणी गंभीर जखमी झाली आहे. याप्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चिपळूण बाजारपेठ राहणाऱ्या 30 वर्षीय तरुणी नोकरीनिमित्त बाहेर गेल्या होत्या. 11 जून 2026 रोजी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास त्या आपल्या दुचाकीवरून गोवळकोट रोड येथील कमानी तिठ्याजवळील इम्रान चायनीज सेंटरच्या मागील रस्त्यावरून जात होत्या. यादरम्यान गोवळकोट येथे राहणारा आरोपी राहिल पटेल (40) याने त्या तरुणीची गाडी अडवली आणि ‘मला तुझ्याजवळ बोलायचे आहे, मोबाईल नंबर अनब्लॉक कर’ असे म्हटले. त्यावर तरुणीने मला तुझ्याशी काहीही बोलायचे नाही आणि तुझ्याशी कोणताही संबंध ठेवायचा नाही, असे स्पष्ट शब्दांत सुनावले. तिच्या या नकारामुळे संशयित आरोपी राहिल पटेल याचा राग अनावर झाला.

आरोपीने भररस्त्यात तिला अश्लील भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. आरोपी एवढ्यावरच थांबला नाही. त्याने त्यांना जोरदार धक्काबुक्की केली आणि हाताच्या ठोशांनी तिच्या उजव्या डोळ्यावर, चेहऱ्यावर आणि डाव्या कानाच्या पाठीमागे जबर मारहाण केली. हा हल्ला एवढा गंभीर होता की,आरोपीने रस्त्यावरील दगड उचलून तिच्या डोक्याच्या मागील डाव्या बाजूला मारला. यात ती रक्तबंबाळ झाली. यानंतर जखमी तरुणीने चिपळूण पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून चिपळूण पोलिसांनी संशयित आरोपी राहिल पटेल याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास चिपळूण पोलीस करत आहेत.