आसाममध्ये जोरहाट हवाईतळावर IAF विमान अपघातात 5 जवानांना वीरमरण, सह-वैमानिक जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आसाममधील जोरहाट हवाईतळावर शनिवारी सकाळी हवाई दलाचे विमान दुर्घटनाग्रस्त झाले. या अपघातात विमानातील पाच जवानांना वीरमरण आले, तर सह-वैमानिक जखमी झाला आहे. जखमी सह-वैमानिकाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. स्क्वॉड्रन लीडर प्रशांत सिंह, फ्लाईट लेफ्टनंट शुभम कुमार, सार्जंट जितेंद्र शर्मा, अग्निवीरवायू खेमाराम कुमावत आणि अग्निवीरवायू दानिश आलम यांना कर्तव्य बजावताना वीरमरण आले.

हवाई दलाचे AN-32 या विमानाला लँडिंगनंतर आग लागली. हवाई तळावरील अग्नीशमन दल आणि आपत्कालीन पथकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकार्य हाती घेतलं. हवाई दलाने एक निवेदन जारी करत या घटनेला दुजोरा दिला आहे. तसेच घटनेबद्दल दुःख व्यक्त केले आहे. हवाई दलाने अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी चौकशीचे आदेश दिले आहेत.