
वैद्यकीय प्रवेशासाठी घेतली जाणारी नीट परीक्षा वारंवार देऊनही नापास झाल्यामुळे आलेल्या नैराश्यातून एका 21 वर्षीय तरुणाने थेट लष्करात ब्रिगेडियर असल्याचे भासवण्यास सुरुवात केले. मात्र, लष्कराच्या गुप्तहेर विभागाने रचलेल्या सापळ्यात हा बनावट ब्रिगेडियर सापडला आणि शुक्रवारी त्याला रंगेहात पकडण्यात आले. आर्यन वर्मा असे या अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव असून त्याच्या कारनाम्याने पोलीस आणि लष्करी अधिकारीही चक्रावले आहेत. ‘हिंदुस्थान टाइम्स‘ने याबाबत वृत्त दिले आहे.
एप्रिल महिन्यापासून लष्कराच्या गुप्तहेर विभागाला उत्तर प्रदेशमधील शाहजहानपूर आणि आसपासच्या परिसरात एक तरुण ब्रिगेडियरचा स्टार लावलेला गणवेश घालून फिरत असल्याची माहिती मिळत होती. तो सातत्याने आपले ठिकाण बदल होता. त्यामुळे त्याला पकडण्यासाठी लष्कराने सापळा रचला. लष्कराच्या अधिकाऱ्यांनी सामान्य नागरिक बनून आर्यनशी संपर्क साधला.
लष्कर भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांना मार्गदर्शन करण्यासाठी तुमच्यासारख्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या प्रेरणादायी भाषणाची गरज आहे, असे सांगून त्याला शाहजहानपूर कॅन्टोन्मेंटमधील शहीद संग्रहालयात मुख्य अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आले. हा मान स्वीकारत आर्यन पूर्ण तयारीनिशी तिथे पोहोचला आणि लष्कराच्या जाळ्यात अडकला.
शुक्रवारी सकाळी जेव्हा आर्यन कार्यक्रमस्थळी पोहोचला, तेव्हा त्याचा थाट पाहून प्रत्यक्ष लष्करी जवानही काही काळ थक्क झाले. तो एका महागड्या हॅरियर गाडीतून आला होता. त्या गाडीवर वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांच्या गाडीप्रमाणे अधिकृत स्टार्स आणि ध्वज लावलेले होते. त्याच्या सुरक्षेसाठी सोबत दोन धिप्पाड बाउन्सर होते. हे आपले एनएसजी कमांडो असून आपल्याला विशेष सरकारी सुरक्षा मिळाली असल्याचा दावा आर्यन करायचा. तो गाडीतून उतरताच दबा धरून बसलेल्या लष्कराच्या पथकाने त्याला आणि त्याच्या ड्रायव्हरला जागीच ताब्यात घेतले.
लष्कराने केलेल्या प्राथमिक तपासणीत आर्यनकडे अनेक धक्कादायक गोष्टी सापडल्या. त्याच्याकडे आर्म्स फोर्सेस मेडिकल कॉलेजच्या डीनचा बनावट शिक्का असलेले ओळखपत्र, लष्कराची मानाची छडी आणि एक बनावट पिस्तूल आढळले. एवढेच नाही तर त्याच्या ड्रायव्हरकडेही बनावट सरकारी ओळखपत्र आढळले आहे. सध्या आर्मी इंटेलिजन्सचे पथक आरोपीची कसून चौकशी करत आहे. लष्कराची चौकशी पूर्ण झाल्यानंतर त्याला पोलिसांच्या हवाली केले जाईल. त्यानंतर रीतसर एफआयआर नोंदवून पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी माहिती शाहजहानपूरचे पोलीस अधीक्षक सौरभ दीक्षित यांनी दिली.
दरम्यान, 21 वर्षीय आर्यन वर्मा दिल्लीत राहून नीट परीक्षेची तयारी करत होता. मात्र तो त्यात सतत नापास होत होता. त्याचे कुटुंब उच्चशिक्षित आहे. त्याचे वडील फलोत्पादन विभागात अधिकारी असून आई शिक्षिका आहे. मात्र परीक्षेत यश मिळत नसल्याच्या नैराश्यातून त्याने हा बनावट अधिकारी बनण्याचा मार्ग निवडला की यामागे लष्कर भरतीच्या नावाखाली तरुणांची आर्थिक फसवणूक करण्याचा काही मोठा डाव होता, याचा तपास आता बरेलीचे लष्करी गुप्तहेर पथक करत आहे.



























































