
काॅक्रोच जनता पार्टीचे सौरव दास आणि आशुतोष रंका यांनी शुक्रवारी (२३ ऑक्टोबर) SEM न्यायालयासमोर हजेरी लावल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आंदोलनाची पुढील दिशा, आगामी रणनीती आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आपली भूमिका स्पष्ट केली. आंदोलनाची पुढील दिशा सर्वांशी चर्चा करून ठरवण्यात येईल, असे आशुतोष रांका यांनी सांगितले.
आशुतोष रांका यांनी सांगितले की, शुक्रवारी त्यांच्या जामीनदारांची पडताळणी करण्यात आली. न्यायालयाने पुढील तारीख १३ नोव्हेंबर दिली आहे. गुन्हे शाखेने बजावलेल्या नोटिशीबाबत बोलताना त्यांनी पहिल्या नोटिशीच्या वेळी उपस्थित राहता आले नसल्याचे सांगितले. आता पुढील तारखेची प्रतीक्षा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. आंदोलनाच्या पुढील रणनीतीबाबत विचारले असता सौरव दास म्हणाले, की यासंदर्भातील निर्णय सामूहिकरीत्या घेतला जाईल. हे आंदोलन केवळ CJP पुरते मर्यादित नसून, अनेक संघटना आणि व्यक्ती त्याच्याशी जोडलेल्या आहेत. त्यामुळे सर्वजण एकत्रित चर्चा करून पुढील दिशा ठरवतील.
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीचा पुनरुच्चार करत दास म्हणाले, की ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा दिलाच पाहिजे. या प्रकरणावर भाष्य करताना सौरव दास यांनी न्यायालयीन प्रक्रियेच्या मर्यादा पाळण्याचे आवाहन केले. प्रकरणाची प्रक्रिया सुरू असताना त्यासंबंधीची माहिती प्रसारमाध्यमांमध्ये उघड केली जात असल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. न्यायालयीन प्रक्रियेचा आदर राखला गेला पाहिजे, असे सांगतानाच, माहिती प्रसारित करणाऱ्यांनी मर्यादा ओलांडल्यास कायदेशीर कारवाईचा विचार केला जाऊ शकतो, असा इशाराही त्यांनी दिला.
आशुतोष रांका यांनी आंदोलनाच्या पुढील वाटचालीबाबत सांगितले की, १४ ऑक्टोबरनंतर त्यांनी कोणत्याही नव्या आंदोलनाची हाक दिलेली नाही. पुढील रणनीतीबाबत चर्चा करून सर्वांना माहिती दिली जाईल. ते म्हणाले, “आम्ही नेते नाही. देशातील जनतेने आम्हाला दिलेल्या या व्यासपीठाचे आम्ही विश्वस्त आहोत. आमच्या परीने सर्वोत्तम योगदान देण्याचा प्रयत्न करत आहोत.” जेलमध्ये असो किंवा बाहेर, आंदोलन सुरूच असल्याचेही रांका यांनी स्पष्ट केले. तुरुंगवासाच्या अनुभवाबद्दल बोलताना त्यांनी सांगितले की, या काळात त्यांना अनेक गोष्टी शिकायला आणि समजून घ्यायला मिळाल्या. स्वतःबद्दल तसेच सत्तेची कार्यपद्धती कशी असते, याबद्दलही नवे अनुभव आल्याचे त्यांनी नमूद केले.



























































