
अंधेरीच्या हॉटेल लीलामधील कामगारांची दिवाळी जोरात आहे. भारतीय कामगार सेनेच्या प्रयत्नांमुळे हॉटेल व्यवस्थापनासोबत मासिक वेतनवाढीचा ऐतिहासिक करार संपन्न झाला. त्यानुसार कर्मचाऱ्यांना 14,500 ते 15 हजार रुपये मासिक वेतनवाढ मिळणार आहे.
वेतनवाढीचा करार घडवून आणण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. या करारावर भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष, शिवसेना नेते-खासदार अरविंद सावंत, कार्याध्यक्ष अजित साळवी, चिटणीस प्रमोद गावकर त्याचप्रमाणे हॉटेल व्यवस्थापनाच्या वतीने जनरल मॅनेजर समीर सूद, एचआर हेड सदाशिव बंगेरा, एचआर मॅनेजर रेश्मा बिरमुले, संजय डाबरे तसेच युनिट अध्यक्ष दीपक शेलार, युनिट सरचिटणीस भालचंद्र महाडिक, युनिट उपाध्यक्ष श्रीनिवास अय्यर, युनिट चिटणीस जयसिंग जाधव, युनिट कमिटी सदस्य मोहनसिंग बिस्ट, हिम्मत ठाकूर, राजेंद्र आमकर, प्रभय्या स्वामी, सुपरवायझर प्रतिनिधी हितेश राजपूत, तेजस भोजने, देवदत्त मुणगेकर यांनी स्वाक्षऱ्या केल्या, अशी माहिती चिटणीस विजय दळवी यांनी दिली.
सेवा कालावधीत निधन झाल्यास दहा लाख रुपये
एकूण वेतनवाढीच्या 50 टक्के रक्कम पहिल्या वर्षी, उरलेली 50 टक्के रक्कम पुढील तीन वर्षे असा एकूण चार वर्षांचा करार करण्यात आला. सेवानिवृत्त कर्मचाऱयाला कायदेशीर देणीव्यतिरिक्त दोन लाख रुपये देण्यात येणार आहेत. सध्या मिळत असलेल्या सर्व सेवासवलती जशाच्या तशा पुढे सुरू राहतील. सेवा कालावधीत एखाद्या कर्मचाऱयाचे निधन झाल्यास कायदेशीर देणीव्यतिरिक्त दहा लाख रुपये मदत निधी म्हणून त्याच्या कुटुंबीयांना देण्यात येतील.
हॉटेल लीला, अंधेरी येथे कित्येक वर्षे भारतीय कामगार सेना कायदेशीररीत्या मान्यताप्राप्त युनियन म्हणून कार्यरत आहे. कामगार-कर्मचाऱ्यांना मिळालेल्या भरघोस पगारवाढीमुळे कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण असून त्यांनी भारतीय कामगार सेनेचे आभार मानले.

























































