ऍमेझॉनने पुन्हा 250 कर्मचाऱ्यांना कामावरून काढले, सकाळी मेसेज पाठवून सांगितले आजचा तुमचा शेवटचा दिवस आहे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गेल्या काही महिन्यांपासून टेक कंपन्यांमध्ये सुरू असलेली कर्मचारी कपातीचा सिलसिला दिवाळीच्या तोंडावरही सुरूच आहे. ऍमेझॉनने पुन्हा एकदा कर्मचारी कपात करण्याचा निर्णय घेतला असून या वेळी कंपनीतील 250 कर्मचाऱयांना कामावरून काढण्यात येणार आहे.

कंपनीने नुकतेच नवीन किंडल ई-रीडर्स, टॅब्लेट्स आणि अलेक्सावर आधारित 5 नवीन स्मार्ट डिव्हाइसेस लॉन्च केले असताना हा निर्णय घेण्यात आला आहे. नोकरीवरून कमी करण्यात आलेल्या कर्मचाऱयांमध्ये सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट टीममधील कर्मचाऱयांवर सर्वाधिक परिणाम झाला आहे. मात्र ही कर्मचारी कपात नेमकी कुठे करण्यात आली आहे, हे अद्याप समोर आलेले नाही. कर्मचाऱयांना 28 ऑक्टोबरला सकाळी ई-मेल आणि टेक्स्ट मेसेजद्वारे कर्मचारी कपातीची माहिती देण्यात आली. ई-मेलमध्ये म्हटले आजचा दिवस तुमचा हा कंपनीतील शेवटचा दिवस आहे. हा ई-मेल डिव्हाइसेस आणि सर्व्हिसेस युनिटच्या एचआर उपाध्यक्षा चेरी रॉबिन्सन यांनी पाठवला होता.

याआधी 16 हजार कर्मचारी कपात

ऍमेझॉनने वर्षभरात मोठी कर्मचारी कपात केली आहे. वर्षाच्या सुरुवातीलाच म्हणजे जानेवारी 2026 मध्ये कंपनीने तब्बल 16 हजार कर्मचाऱयांना कामावरून काढून टाकले होते, तर गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये 14 हजार कर्मचाऱयांना डच्चू देण्यात आला होता.