
‘बोध कीर्तन’ हे पुनःपुन्हा वाचावे असे अप्रतिम पुस्तक आहे. लढायचे कधी आणि थांबायचे कधी हे सांगणारे आणि तुरुंगवास हादेखील विपश्यना ठरू शकते हे दाखवून देणारे हे पुस्तक आहे, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांच्या पुस्तकाचे कौतुक केले.
‘बोध कीर्तन’ पुस्तकाच्या प्रकाशन सोहळय़ात ते बोलत होते. उद्धव ठाकरे यांनी पुस्तकाच्या मांडणीचे विशेष कौतुक केले. ‘अनुक्रमणिका नसलेल्या दुर्मिळ पुस्तकांपैकी हे एक आहे. कुठलेही पान उघडून वाचता येते. काही पानांवर अवघ्या चार ओळी असल्या तरी त्या चार ओळींमध्ये एकेक पुस्तक आहे. इतका अर्थ त्यात दडलेला आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. ‘तुरुंगात जाणे ही गमतीची गोष्ट नाही, पण तुरुंगातल्या नरकामध्येही स्वर्ग शोधणे हे संजय राऊतच करू शकतात,’ असे उद्धव ठाकरे म्हणाले.
संजय राऊत यांचा दैनिक ‘सामना’तील प्रवास मी जवळून पाहिला आहे असे सांगत, उद्धव ठाकरे यांनी शिवसेनाप्रमुखांच्या काळातील आठवणींना उजाळा दिला. अक्षरांचे शब्द होतात आणि शब्दांच्या ओव्या आणि शिव्याही होतात असे बाळासाहेब म्हणायचे. या दोन्हींचे सामर्थ्य संजय राऊत यांच्या लेखणीत आहे. ते अंतरंगात घुसतात आणि अंतरंग जाणून घेतल्यानंतर कटय़ार काळजात घुसल्यासारखे घुसवतात, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
या सोहळ्याला रश्मी ठाकरे, शिवसेना नेते सुभाष देसाई, अंबादास दानवे, विनायक राऊत, खासदार अनिल देसाई, आमदार सुनील प्रभू, मनसे नेते नितीन सरदेसाई, बाळा नांदगावकर यांच्यासह शिवसेनेचे नेते, उपनेते आमदार, नगरसेवक उपस्थित होते.
काहींचा फोन 2019 पासून थांबला
अंबरीश मिश्र यांच्याकडे शिवसेनेने बाळासाहेबांच्या स्मारकातील लिखाणाचे काम दिले आहे. अंबरीश यांच्यासारखी व्यासंगी, ज्ञानी आणि अनुभवाचे बोल अधिकाराने सुनावणारी पत्रकार मंडळी फार कमी राहिलेली आहेत. बाळासाहेब अंबरीशना फोन करायचे तसा मीसुद्धा करायचो. काहीजणांचा फोन थांबला, पण अंबरीश यांच्याबरोबरचा फोन पुन्हा सुरू झाला. काहीजणांचा फोन 2019 पासून थांबला तो थांबला. त्या फोनने काही होणार नाही. अंबरीश यांच्या फोनने काम होईल, असा टोला उद्धव ठाकरे यांनी यावेळी हाणला.
शब्द, पेन म्युझियममध्ये जातील
सध्या लिखाण नाहीसे होत चालले आहे. काही दिवसांनी शब्द आणि पेनसुद्धा म्युझियममध्ये जाईल अशी स्थिती आहे. मोबाईल फोन, चॅट जीपीटीमुळे शब्दांप्रमाणे विचारशक्तीही म्युझियममध्ये जाईल, कारण विचार करायलाच वेळ नाही. रोजच्या रोज काहीतरी आदळवून विचारशक्ती मारून टाकली जात आहे. अशा वेळी ‘बोध कीर्तन’ आणून संजय राऊत यांनी मोठे काम केले आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
चिरंतन सत्याची ओळख करून देणारे पुस्तक
‘बोध कीर्तन’ हे पुस्तक चिरंतन सत्याची ओळख करून देणारे असून साहित्य हे राजकारणावर मात करते हे या पुस्तकाने सिद्ध केले आहे, असे प्रशंसोद्गार ज्येष्ठ पत्रकार-लेखक अंबरीश मिश्र यांनी काढले. हे पुस्तक रटाळ झालेले नाही. कारण पुस्तकात कसलाही आग्रह नाही, दुराग्रह नाही, आवेश नाही, अभिनिवेष नाही, काहीतरी सिद्ध करण्याची घिसाडघाई नाही, काहीतरी खोडून काढण्याची घायकूट नाही, वितंडवादाची खुमखुमी नाही, ईर्षा नाही. यामुळे ते वाचकाच्या मनाची पकड घेते, असे मिश्र म्हणाले. कथा, श्लोक, ओळी, काव्यपंक्ती, निरीक्षणे असा भरगच्च मजकूर यात आहे. तळमळ हे या पुस्तकाचे बळ आहे. इमानाने जगले पाहिजे व शहाणपणाने वागले पाहिजे हे बोध कीर्तन सांगते. सध्या आपण कठीण काळातून जात आहोत, माणसाला समंजस मित्राची गरज आहे, हे पुस्तक म्हणजे एका समंजस मित्राचे मनोगत आहे, असे ते म्हणाले. संजय राऊत यांचे लिखाण पिसांप्रमाणे हलके आहे. या पुस्तकाद्वारे त्यांचे ललित साहित्यात आगमन झाले आहे, असे मिश्र म्हणाले.
संजय राऊत यांनी बाळासाहेबांना आत्मसात केले, त्यांनी बाळासाहेबांचे अनुकरण नाही तर अनुसरण केले.





























































