
>> प्रज्ञा सदावर्ते/भाग्यश्री कुलकर्णी
दक्षिण गंगा-गोदावरीच्या परमपावन तिरावर ब्रह्मवृंदांच्या मंत्रघोषात अश्विन कृष्ण षष्ठीला दुपारी 12 वाजून 2 मिनिटांनी देवगुरू बृहस्पतीचा सिंह राशीत प्रवेश होताच सिंहस्थ महाध्वज फडकला आणि या तीर्थक्षेत्री 71 वर्षांनी आलेल्या त्रिखंडी योगासह महाकुंभाचे पुण्यपर्व अवतरले. शंखांचा मंगलध्वनी आणि गोदामातेच्या जयजयकाराने आसमंतही अलौकिक ऊर्जेने आणि भावभक्तीने भारून गेला. नाशिकचे श्रीरामकुंड येथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आणि त्र्यंबकेश्वरच्या तीर्थराज कुशावर्त येथे जगद्गुरू शंकराचार्य श्री विधुशेखर भारती यांच्या हस्ते धर्मध्वजारोहण झाले. देवदेवतांना आगमनाचे आवाहन करीत ध्वजाच्या साक्षीने पुढील 22 महिन्यांचे हे पुण्यपर्व निर्विघ्न संपन्न होऊ दे यासह मानवकल्याणासाठी प्रार्थना करण्यात आली. संत-महंत, राज्यपाल, मुख्यमंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत हजारो भाविकांनी प्राचीन संस्कृतीचे वैभव आणि आध्यात्मिक वारसा असलेला हा दिव्य सोहळा डोळ्यांत साठवला.
पवित्र गोदावरी नदीतिरावर जनस्थान नाशिक आणि आद्य ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर येथे दर बारा वर्षांनी सिंहस्थ कुंभमेळा होतो. यावेळी कुंभपर्वाला त्रिखंडी योगाचे कोंदण लाभल्याने पर्वकाळ 22 महिन्यांचा राहणार आहे. नाशिकचे श्रीरामकुंड व त्र्यंबकेश्वरचे तीर्थराज कुशावर्त अपूर्व उत्साहासह या पुण्यपर्वासाठी अनुपम साज लेवून सज्ज झाले होते. श्रीरामकुंड येथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे सकाळी साडेअकरा वाजता आगमन झाले, त्यांच्या हस्ते भव्य कुटीमध्ये देवता पूजा, तीर्थपूजन, यज्ञपूजन करण्यात आले. त्यानंतर त्यांनी गंगा-गोदावरीचे पूजन केले. प्राचीन गोदावरी मंदिरात दर्शन घेतले. सोहळ्यास प्रमुख उपस्थिती लाभलेले नाणिजधामचे जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज, श्रीमहंत ग्यानदास महाराज यांची भेट घेतली. ब्रह्मवृंदांच्या मंत्रघोषात विधीवत पूजन करून राष्ट्रपतींच्या हस्ते महाध्वज फडकवण्यात आला, त्याच वेळी गंगा-गोदावरी मंदिरावरील ध्वजाचेही आरोहण पूर्ण झाले. गोदावरी मातेची आरती करून पुण्यपर्वाच्या यशस्वीतेसाठी प्रार्थना करण्यात आली.
राष्ट्रपतींनी घेतले भगवान त्र्यंबकेश्वराचे दर्शन
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भगवान त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेतले. तत्पूर्वी पवित्र कुशावर्त तीर्थावर सिंहस्थ धर्मध्वज पूजन केले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे शनिवारी त्र्यंबकेश्वरला आगमन झाले. प्रथम त्यांच्या उपस्थितीत कुशावर्त तीर्थ येथे ब्रह्मवृंदांच्या मंत्रोच्चारात धार्मिक विधींना सुरुवात झाली. त्यांच्या हस्ते धर्मध्वजाचे, तसेच गौतमी गंगा-गोदावरी मातेचे पूजन करण्यात आले. विशेष अर्घ्य अर्पण करून त्यांनी गोदामातेची आरतीही केली. त्यानंतर भगवान त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेऊन आरती करण्यात आली. यावेळी राज्यपाल जिष्णु देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार, कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन, मंत्री दादा भुसे, जयकुमार रावल, हरिगिरी महाराज यांच्यासह पुरोहित संघाचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, अधिकारी उपस्थित होते.
नाशिकच्या पवित्र श्रीरामकुंड येथे चैतन्यमय वातावरणात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सिंहस्थाचे महाध्वजारोहण संपन्न झाले.
त्र्यंबकेश्वरच्या तीर्थराज कुशावर्त येथे धर्मध्वजारोहण करताना जगद्गुरू शंकराचार्य श्री विधुशेखर भारती. समवेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
त्र्यंबकेश्वरी मंगलपर्व आरंभले
ब्रह्मगिरी पर्वताच्या कुशीतील त्र्यंबकेश्वर कुंभनगरीत तीर्थराज कुशावर्त येथे ध्वजारोहण सोहळ्यास जगद्गुरू शंकराचार्य श्री विधुशेखर भारती आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. प्रारंभी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते तीर्थ पूजन झाले. शंखनाद, मंगलवाद्यांच्या निनादात शंकराचार्य यांच्या हस्ते ध्वजपूजन व ध्वजारोहण संपन्न झाले. गंगा-गोदावरी माता, भगवान त्र्यंबकेश्वर आणि निवृत्तीनाथ महाराज यांचा जयघोष करण्यात आला. पुरोहित संघाच्या वतीने शंकराचार्यांना कृतज्ञतापत्रम् देऊन आशीर्वाद घेण्यात आला. त्यानंतर श्रीचंद्रघाट येथेही विधीवत पूजन होऊन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वज फडकवण्यात आला.
गोदावरीची विश्वविक्रमी महाआरती
धर्मध्वजारोहणानंतर गोदाकाठावरील श्रीरामकुंड येथे शनिवारी सायंकाळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या प्रमुख उपस्थितीत गोदावरीची महाआरती करण्यात आली. हा अपूर्व सोहळा हजारो भाविकांनी अनुभवत गंगा-गोदावरी मातेचा जयघोष केला.
त्र्यंबकेश्वर, सुरगाणा, निफाड तालुक्यातील साडेसहाशे गावांमधील साडेसहा हजार आदिवासी स्त्री, पुरुषांच्या हस्ते गोदामाईची महाआरती करण्यात आली. विशेष म्हणजे पौरोहित्य महिला पुरोहितांनी केले. याप्रसंगी सिंहस्थ महाकुंभमेळ्याच्या परंपरेचा गौरव म्हणून टपाल विभागाच्या दोन विशेष तिकिटांचे, तसेच कुंभमेळा प्राधिकरण संकेतस्थळ आणि सिंहस्थ गीताचे अनावरण राष्ट्रपतींसह मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले.
कुशावर्त तीर्थ वंदना
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत कुशावर्त तीर्थ येथे ब्रह्मवृंदांच्या मंत्रोच्चारात धार्मिक विधी सुरू झाले. त्यांच्या हस्ते धर्मध्वजाचे तसेच गौतमी गंगा-गोदावरी मातेचे पूजन करण्यात आले. विशेष अर्घ्य अर्पण करून त्यांनी गोदामातेची आरतीही केली.
विशेष टपाल तिकीट
महाआरती सोहळ्याप्रसंगी महाकुंभ विशेष टपाल तिकिटांचे अनावरण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते करण्यात आले. शंखनाद, मंगल वाद्यांच्या नादात गंगा-गोदावरी, भगवान त्र्यंबकेश्वर आणि निवृत्तीनाथ यांचा जयघोष करण्यात आला.

































































