विशेष – धनत्रयोदशीचा भावार्थ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> सुनील हिंगणे

रूढार्थाने दिवाळी जरी नरक चतुर्दशीपासून सुरू होत असली तरी खरा सण धनत्रयोदशीपासून सुरू होतो. सध्या प्रत्येकाला आपण धनवान असावे असे वाटते. हे धन नेमके कोणते असावे याचे महत्त्व सांगणारा हा दिवस सर्वार्थाने मोठा आहे.

भारतात सर्वत्र अत्यंत आनंदानी साजरा केला जाणारा सण म्हणजे दिवाळी. विविध प्रकारच्या दिव्यांनी उजळविणारा हा सण. दिवाळीतील प्रत्येक दिवसाला काही महत्त्व असते. यातलाच एक दिवस म्हणजे धनत्रयोदशी. दिवाळीच्या दुसऱय्य्या दिवशी आश्विन शुद्ध त्रयोदशीला यमराजाला प्रसन्न करायचे असते. यमाला प्रसन्न करण्यासाठी यम दीपदान केले जाते. यासाठी घरावर, मंदिरावर, उंच अशा ठिकाणी तेलाचे दिवे, पणत्या लावून विष्णू, कुबेर, गणपती, नाग व इतर द्रव्यानिधींची संध्याकाळी पूजा केली जाते. याच दिवशी देवांचा वैद्य धन्वंतरी यांचा जन्म झाला म्हणून वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्ती धन्वंतरीची पूजा करतात.

रूढार्थाने दिवाळी जरी नरक चतुर्दशीपासून सुरू होत असली तरी खरा सण धनत्रयोदशीपासून सुरू होतो. सध्या प्रत्येकाला आपण धनवान असावे असे वाटते. हे धन नेमके कोणते असावे याचे महत्त्व सांगणारा हा दिवस सर्वार्थाने मोठा आहे. ज्या व्यक्तीकडे शारीरिक आणि मानसिक आरोग्य आहे तो खरा धनवान! धनत्रयोदशीला धनाची आणि आरोग्य देवता धन्वंतरी या दोघांची मनोभावे पूजा केली जाते. दुर्दैवाने सध्या माणूस केवळ धन मिळविण्याच्या मागे असल्याने खऱया शरीरसंपदेकडे त्याचे पुरेसे लक्ष नाही. या दिवाळीत धनासोबत आरोग्यदेखील कमविण्याचा निश्चय करणे आवश्यक आहे. यम दीपदान करण्यामागे एक पौराणिक कथा सांगितली जाते. या गोष्टीचा संबंधदेखील आरोग्याशी आहे. दीर्घायुष्यासाठी यमाला प्रसन्न करून घेण्यासाठी धनत्रयोदशीला संध्याकाळी दक्षिणेकडे तोंड करून कणकेचा दिवा लावला जातो. दक्षिण ही यमाची दिशा मानली जाते. दिवा लावल्यानंतर

“मृत्युनां दण्डपाशाभ्यां कालेन शामया सहा

त्रयोदशां दीपदानात सूर्यजः प्रियतां मम।’’

असा श्लोक म्हणला जातो. यामागची कथा अशी आहे, एकदा यमदेवाने आपल्या दूतांना प्रश्न केला की, आजपर्यंत अनेक माणसांचे प्राण हरण केले आहेत; पण एखाद्या प्रसंगी तुम्हाला कुणाची कणव आली आहे का? यावर दूत म्हणाले, हेमराज नावाच्या राजाचा सर्वगुणसंपन्न असा एक मुलगा होता. त्याचे प्राण हरण करताना आम्हाला अतिशय दुःख झाले. या मुलाचा नुकताच विवाह झालेला आणि लगेचच आम्हाला त्याचे प्राण घ्यावे लागले. हे करत असताना आम्हालाही अश्रू अनावर झाले. हे ऐकून यमराजाचे डोळे भरून आले आणि ते म्हणाले, ‘जे लोक आश्विन कृष्ण त्रयोदशीला मला दीपदान करतील आणि पुढे पाच दिवस दीपोत्सव साजरा करतील त्यांच्यावर अपमृत्यूचा प्रसंग येणार नाही.’ तेव्हापासून यमदीपदान करण्याची प्रथा सुरू झाली. यामध्ये जीवनदान म्हणजेच चांगले आरोग्य म्हणजेच दीर्घायुष्य. येणारा मृत्यू हा अपमृत्यू नसेल, तर तो कालचक्राप्रमाणे असेल. अपमृत्यू येऊ नये यासाठी आरोग्याचे वरदान आवश्यक आहे. यासाठीच धन्वंतरी आणि यमाची मनोभावे पूजा केली जाते. आपल्याला जगण्यासाठी बुद्धी, श्रम आणि अर्थाची म्हणजेच पैशांची गरज असते. पण जर आरोग्य चांगले असेल तरच या सर्व गोष्टी सहजसाध्य करता येतात. ‘आरोग्यम धनसंपदा’ या विचाराची सदैव जाणीव राहावी म्हणून धनत्रयोदशी साजरी केली जाते.

आज संपूर्ण जगात भारत आयुर्वेदाचे नेतृत्व करत आहे. या आयुर्वेदाचे जनक धन्वंतरीला मानले जाते. आयुर्वेदात आजारी पडल्यावर उपचार पद्धती आहेतच पण आयुष्यभर आजारी पडू नये यासाठीही उपाय सांगितले आहेत. आयुर्वेदाच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे हा दिवस केवळ देशात नाही, तर पाश्चिमात्य देशातही साजरा होतो. धन म्हणजे शुद्ध लक्ष्मी. श्रीसूक्तामध्ये वायू, जल, अग्नी आणि सूर्य यांना धन म्हटले आहे. ज्या धनाला खरा अर्थ आहे तीच खरी लक्ष्मी. धनत्रयोदशीला सोने घेण्याचा प्रघात आहे. यामुळे वर्षभर धनलक्ष्मी वास करते. लक्ष्मीपूजनाला जमाखर्च द्यायचा असतो. धन म्हणजे पैसा. पैसा हा कष्टाचा, घाम गाळून कमविलेला म्हणजे धवलांकित समजला जातो. पै-पै जोडून कमविलेले हे धन योग्य ठिकाणी खर्च करावे. त्या धनातून सत्पात्री दान करावे असे शास्त्र सांगते.

थोडक्यात, आपल्याकडे असलेल्या सर्व प्रकारच्या धनाची पूजा करावी असे हा दिवस सांगतो. व्यापारी लोक या दिवशी पाटावर लक्ष्मीची मूर्ती, सोने, नाणे यांची, शेतकरी आपले धान्य हेच त्यांच्यासाठी धन असल्याने विविध प्रकारच्या धान्याची, वैद्यकीय क्षेत्रातील धन्वंतरीची पूजा करतात. धणे-गुळाचा नैवैद्य दाखवला जातो. या दिवसांत झेंडू आणि शेवंतीची फुले मुबलक प्रमाणात येत असल्याने त्याचा पूजेसाठी वापर करतात. दिवाळीतील हा दुसरा दिवस आपल्याला सर्वार्थाने आनंददायी आणि आरोग्यसंपन्न जीवन मिळावे यासाठीची प्रार्थना करणारा आहे.

(लेखक अध्यात्म अभ्यासक  आहेत.)