
राज्यात सध्या दुष्काळाची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. तीनशेहून अधिक तालुक्यांतील दीड कोटीपेक्षा अधिक शेतकऱयांना दुष्काळाचा प्रचंड मोठा फटका बसला आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम अजूनही पूर्ण झालेले नाही. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी पाच हजार रुपयांची मदत देण्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे. पण ही मदत केवळ पंचनामे पूर्ण झालेल्या आणि 33 टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेल्या पात्र शेतकऱ्यांनाच मिळणार आहे. त्यामुळे अनेक शेतकरी मदतीपासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाले आहे.
राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाच्या वतीने मंत्रिमंडळ बैठकीत राज्याच्या दुष्काळजन्य परिस्थितीचे सादरीकरण करण्यात आले. त्यातील नोंदीनुसार 8 ऑक्टोबर 2026 रोजी राज्यातून मान्सून माघारी फिरला आहे. राज्यात सध्या गंभीर दुष्काळी परिस्थिती असून राज्यातील 304 तालुक्यांना दुष्काळाचा गंभीर फटका बसला आहे. क्षेत्रीय यंत्रणेमार्फत शेतकऱयांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे.
दोन दिवसांत खात्यात पैसे जमा – फडणवीस
दुष्काळग्रस्त 304 तालुक्यांतील सुमारे दीड कोटी शेतकऱ्यांना अंतरिम मदत म्हणून प्रत्येकी पाच हजार रुपये देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे. येत्या दोन दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये पैसे जमा करण्याची प्रक्रिया सुरू होईल आणि दिवाळीपूर्वी सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यांत रक्कम पोहोचविण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. यासाठी आवश्यक निधीलाही मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे, अशी माहितीही देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
दुष्काळग्रस्तांच्या मदतीचे निकष
राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱयांना प्रत्येकी पाच हजार रुपयांची नुकसानभरपाई देण्याची घोषणा झाली आहे. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची संख्या सुमारे दीड कोटी आहे. मात्र नुकसानभरपाईची मदत केवळ पंचनामे पूर्ण झालेल्यांना आणि 33 टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेल्या पात्र शेतकऱयांना लाभ देण्यात येणार आहे. तालुकानिहाय, गावनिहाय आणि फार्मर आयडीनिहाय बाधित क्षेत्राची नोंद केली जात आहे. पोर्टलवरील नोंदी तहसीलदारांकडून होय अथवा नाही स्वरूपात पडताळल्या जाणार आहेत.
असा निधी उपलब्ध होणार
दुष्काळ लेखाशीर्षांतर्गत दोन हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध आहे. वित्त विभागाकडून साडेपाच हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. अशा प्रकारे अंतरिम मदतीसाठी 7 हजार 500 कोटी रुपयांच्या एकूण निधीची व्यवस्था उपलब्ध करण्यात आली आहे.
करदात्यांना 5 हजारांचे अनुदान नाही
दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणाऱया 5,000 रुपयांच्या अनुदानातून इन्कम टॅक्स भरणारे शेतकरी, शासकीय अधिकारी-कर्मचारी आणि लोकप्रतिनिधी यांना वगळण्यात आले आहे. कर्जमाफीच्या धर्तीवरच हे निकष कडकपणे लागू केले जातील.





























































