मुशीरच्या चेंडूनेही हरियाणा हादरला; मुंबईच्या 430 धावा, तर पाहुण्यांची 2 बाद 108 अशी मजल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आधी बॅटने शतकी तडाखा दिल्यानंतर चेंडूनेही हरियाणाला दुहेरी दणका देत युवा मुशीर खानने हादरवले. त्याने आपली अष्टपैलू खेळाची ताकद दाखवत मुंबईच्या विजयाच्या हॅटट्रिक आशांना नवी धार दिली. मुंबईचा पहिला डाव 430 धावांवर संपुष्टात आल्यानंतर हरियाणाने सावध सुरुवात केली; पण मुशीरच्या लागोपाठच्या दोन विकेट्सनी त्यांच्या गोटात खळबळ उडवली. दिवसअखेर हरियाणा 2 बाद 108 धावांवर असून मुंबईला सलग तिसऱया डावाच्या विजयाची हॅट्ट्रिक खुणावत आहे.

सोमवारी 3 बाद 290 धावांवर असलेल्या मुंबईला आज मोठय़ा धावसंख्येपर्यंत नेण्याचे काम युवा शिलेदारांनी केले. अंगक्रिश रघुवंशी आणि मुशीर खानने शतक झळकावत दुसऱया विकेटसाठी 208 धावांची दमदार भागीदारी केली आणि हरियाणाच्या गोलंदाजांना अक्षरशः दमवले, मात्र आजच्या दिवसाच्या सुरुवातीला मुंबईची मधली फळी झटपट गडगडली. सिद्धेश लाडला अमन कुमारने बाद केले. सरफराज खान, आकाश आनंद आणि शम्स मुलानी यांच्या विकेट्स पडल्याने मुंबईची अवस्था काही काळ बिकट झाली. पण मुंबईची खालची फळीही सहज शरण जाणारी नव्हती. तनुष कोटियनने अर्धशतक ठोकत धावसंख्येला बळ दिले. अखेर मुंबईने 430 धावांचा टप्पा गाठला आणि हरियाणासमोर मोठे आव्हान उभे केले.

हरियाणाच्या फलंदाजांनी सुरुवातीला प्रतिकार केला. हिमांशू राणा आणि अंकित कुमार यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला, मात्र मुशीरने अंकितला 35 धावांवर पायचीत पकडले आणि पुढच्याच षटकात राणाला सरफराज खानकरवी झेलबाद केले. सोमवारी शतक ठोकणाऱया मुशीरने आज चेंडूनेही आपली चमक दाखवत मुंबईला सामन्यात वरचढ होण्याची संधी मिळवून दिली. आता उद्या मुंबईच्या गोलंदाजांना हरियाणाचा डाव लवकर गुंडाळण्याची संधी आहे.