
जाफराबाद जिल्ह्यासह संपूर्ण राज्याला हादरवून सोडणारी अत्यंत संतापजनक आणि मानवतेला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. पैशांच्या वादातून एका निष्पाप चिमुकल्याला हातपाय बांधून निर्दयीपणे मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या अमानुष मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर पोलीस प्रशासनाने तात्काळ दखल घेत संबंधित बालकाची सुखरूप सुटका केली आहे. सावत्र वडिलांविरूद्ध जाफराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संबंधित चिमुकल्याच्या आईच्या दुसऱ्या पतीने पैशांच्या कारणावरून बालकाला लक्ष्य करत त्याचे हातपाय बांधले आणि त्याला अमानुषपणे मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली असून आरोपीविरुद्ध कठोर कारवाईची मागणी होत आहे. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच जालना पोलिसांनी तत्परतेने हालचाली सुरू केल्या.
पोलिसांनी संबंधित बालकाचा शोध घेत त्याची सुखरूप सुटका केली. सध्या या चिमुकल्याला त्याच्या नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले असून, त्याची प्रकृती सुरक्षित असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी चिमुकल्याच्या आईच्या दुसऱ्या पतीविरोधात जाफराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, प्राथमिक तपासात ही घटना शिर्डी परिसरात घडल्याचे समोर आल्याने पुढील कायदेशीर कारवाईसाठी हा गुन्हा शिर्डी येथील संबंधित पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात येणार असल्याची माहिती जालना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तेघबीर सिंह संधू यांनी दिली. पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला असून, आरोपीविरोधात कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.





























































