
जून महिन्यातील बारा दिवस उलटले तरी पावसाचा पत्ता नाही. उन्हाच्या झळा मात्र दिवसेंदिवस वाढत असून केवळ पाच हजार लोकसंख्या असलेल्या न्हावा ग्रामस्थांचा घसा कोरडाच आहे. पाणीटंचाईचे चटके आता असह्य होत चालले असून हेटवणे धरणाची पातळी कमी झाल्याने १५ दिवसांतून फक्त अर्धा तासच पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे न्हावावासीयांना आता टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे.
१० दिवसांपासून हेटवणे धरणातून होणारा पाणीपुरवठा अडीच लाख लिटरऐवजी फक्त एक ते दीड लाख लिटरचा पाणीपुरवठा होत आहे. तोही कमी दाबाने असल्याने नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. मात्र नागरिकांना भेडसावणारी पाणीटंचाई दूर करण्यासाठी मागील दोन दिवसांपासून दररोज २२ हजार क्षमतेचे पाच ते सहा टँकरचे पाणी अंडर ग्राऊंड पाण्याच्या टाकीत ओतले जाते. त्यानंतर ओव्हरहेड पाण्याच्या टाकीतून गावकऱ्यांना पाणी वितरित करण्यात येत असल्याचे न्हावा ग्रामपंचायतीचे सरपंच विरेंद्र पाटील यांनी सांगितले.
रोज अडीच लाख लिटरची मागणी
न्हावामधील नागरिकांना पुरेसा पाणीपुरवठा करण्यासाठी ग्रामपंचायतीची दररोज अडीच लाख लिटर पाण्याची मागणी आहे. सिडकोच्या हेटवणे धरणातून न्हावा गावातील नागरिकांना पाणीपुरवठा केला जातो. आधी दीड लाख क्षमतेच्या अंडर ग्राऊंड पाण्याच्या टाकीत पाणी साठवले जाते. त्यानंतर डोंगरावरील उंच जागी बांधण्यात आलेल्या ओव्हरहेड पाण्याच्या टाकीत विद्युत पंपाच्या साहाय्याने पाणी टाकीत सोडले जाते.
किमान पाणीसाठा जमा होईपर्यंत हीच स्थिती
न्हावा गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या हेटवणे धरणाचीच पाण्याची पातळी कमी झाली आहे. यामुळे कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे या हेटवणे धरणातून पाणीपुरवठा होणाऱ्या सर्वांनाच पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. किमान धरणात पाणीसाठा जमा होईपर्यंत हीच स्थिती कायम राहणार असल्याचे सिडकोचे सहाय्यक कार्यकारी अभियंता ओमकार शेट्ये यांनी सांगितले.
- न्हावे ग्रामस्थांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. १५ दिवसांत अवघा ३० मिनिटे पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे नागरिकांना पाणी साठवून ठेवण्याची वेळ येते. मुख्य जलवाहिनीवरून काही व्यक्तींनी अनधिकृत जोडण्या घेऊन पाणीचोरी करत आहेत.
- पाणीचोरी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची आवश्यकता आहे. या प्रकारामुळे अधिकृत ग्राहकांना मिळणाऱ्या पाण्याच्या प्रमाणात मोठी घट होत आहे.
- सध्या टँकरने केला जाणारा पाणीपुरवठा पुरेसा नाही. असा आरोप ग्रामसुधारक मंडळ न्हावेचे माजी अध्यक्ष योगेश पाटील यांनी केला आहे. पाण्याच्या समस्येकडे लोकप्रतिनिधी, स्थानिक आमदारांचेही अक्षम्य दुर्लक्षच होत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे.




























































