
अमेरिकेत राहणाऱ्या आशियाई आणि पॅसिफिक आयलँडर (एएपीआय) समुदायातील बहुतांश नागरिकांच्या मते अमेरिका आता स्थलांतरितांसाठी सुरक्षित राहिलेली नाही. ट्रम्प प्रशासनाच्या अत्यंत कडक आणि आक्रमक इमिग्रेशन धोरणांमुळे या समुदायात मोठ्या प्रमाणावर असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. एएपीआय डेटा आणि AP-NORC यांनी संयुक्तपणे केलेल्या एका नवीन राष्ट्रीय सर्वेक्षणातून हा धक्कादायक खुलासा झाला असूनयामुळे अमेरिकेच्या जागतिक प्रतिमेला मोठा तडा गेल्याचे चित्र आहे. ‘एबीसी न्यूज‘ने याबाबत वृत्त दिले आहे.
या नवीन पोलनुसार, दर 10 पैकी 6 आशियाई प्रौढांचे स्पष्ट मत आहे की, अमेरिका पूर्वी स्थलांतरितांसाठी एक महान देश होता. परंतु आता परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. सर्वेक्षणात सहभागी झालेल्या जवळपास 50 टक्के नागरिकांनी सांगितले की, कठोर नियमांमुळे त्यांच्या ओळखीच्या कोणाला तरी गेल्या वर्षभरात इमिग्रेशन विभागाने ताब्यात घेतले आहे किंवा थेट देशाबाहेर हाकलले आहे. या भीतीपोटी अनेक आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांनी मायदेशी असणाऱ्या आपल्या कुटुंबाला भेटण्याचे प्रवासाचे बेत देखील रद्द केले आहेत.
प्रशासनाच्या या आक्रमक भूमिकेमुळे आता कायदेशीर नागरिकत्व किंवा ग्रीन कार्ड असणाऱ्या नागरिकांनाही दैनंदिन जीवनात कसरत करावी लागत आहे. टेक्सासमधील व्हिएतनामी वंशाचे रहिवासी खोआ ट्रान यांनी सांगितले की, सोशल मीडियावरील बातम्या आणि कडक कारवाया पाहता, सुरक्षेचा उपाय म्हणून त्यांच्या पत्नीला आता ड्रायव्हिंग लायसन्ससोबत तिचे ग्रीन कार्ड नेहमी सोबत ठेवावे लागते. दक्षिण आशियाई समुदायामध्ये ही भीती अधिक असून अनेक दशकांपासून अमेरिकेत राहणारे लोकही आता स्वतःच्या कायदेशीर अस्तित्वाबद्दल साशंक झाले आहेत.
दुसरीकडे, या बदलत्या राजकीय वातावरणामुळे आशियाई नागरिकांचा अमेरिकन ओळखीपेक्षा त्यांच्या मूळ संस्कृतीकडील ओढा अधिक वाढल्याचे सर्वेक्षणात दिसले आहे. साधारण 54 टक्के नागरिकांना त्यांच्या अमेरिकन नागरिकत्वापेक्षा त्यांच्या मूळ देशाचा वारसा आणि संस्कृती अधिक महत्त्वाची वाटते. मूळ हिंदुस्थानी वंशाच्या अबीगेल जेयराज यांनी सांगितले की, मी स्वतःची ओळख साऊथ एशियन अमेरिकन अशी करून देते. अमेरिकेत मला मिळालेल्या संधींबद्दल कृतज्ञता असली, तरी हिंदुस्थानी संस्कृतीशी माझे नाते नेहमीच घट्ट आणि अभिमानाचे राहील.
अमेरिका चालू वर्षामध्ये आपल्या स्वातंत्र्याचा 250 वा वर्धापनदिन साजरा करत असतानाच हे सर्वेक्षण समोर आल्याने या उत्सवावर चिंतेचे सावट आहे. स्थलांतरितांवर येणारे निर्बंध आणि विविधता व समानता उपक्रमांना होणाऱ्या विरोधामुळे आशियाई तरुण पिढी कमालीची नाराज आहे. आशियाई अमेरिकन हा अमेरिकेतील सर्वात वेगाने वाढणारा लोकसंख्या गट असून, त्यांच्यातील वाढती नाराजी ही अमेरिकेच्या भविष्यासाठी आणि अर्थव्यवस्थेसाठी एक मोठी धोक्याची घंटा मानली जात आहे.
























































