
अंकिता भंडारी हत्या प्रकरणात एका ‘व्हीआयपी’ (VIP) चे नाव घेण्याशी संबंधित एक ऑडिओ-व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली होती. या प्रकरणी सुरू असलेल्या तपासाच्या अनुषंगाने भाजपचे माजी आमदार सुरेश राठोड यांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिसांनी सोमवारी दिली.
पोलीस अधीक्षक (शहर) प्रमोद कुमार यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, राठोड यांना हरिद्वारमधील बुग्गावाला येथील त्यांच्या कार्यालयातून ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर त्यांना डेहराडूनमधील दलनवाला पोलीस ठाण्यात आणून रीतसर अटक करण्यात आली.
तीन दिवसांपूर्वीच सुरेश राठोड यांनी एक पत्रकार परिषद घेतली होती, ज्यामध्ये त्यांनी उत्तराखंड उच्च न्यायालयाने त्यांच्याविरुद्ध बहादराबाद आणि झबरेरा पोलीस ठाण्यात नोंदवलेले चारपैकी दोन एफआयआर (FIR) रद्द केल्याचे सांगितले होते. त्यानंतर आज पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
या प्रकरणात सोशल मीडियावर आक्षेपार्ह ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिप व्हायरल केल्याच्या आरोपावरून राठोड यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आले होते. राठोड यांनी सांगितले होते की, दलनवाला आणि नेहरू कॉलनी पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या उर्वरित दोन प्रकरणांचा तपास अजूनही सुरू आहे आणि ते पोलिसांना पूर्ण सहकार्य करत आहेत.
उत्तराखंड उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती राकेश थपलियाल यांच्या एकल पीठाने ४ जून रोजी राठोड यांच्याविरुद्धचे दोन एफआयआर रद्द केले होते, परंतु उर्वरित दोन एफआयआरमध्ये पोलिसांना तपास सुरू ठेवण्याची परवानगी दिली होती.

























































