
फार्महाऊसवर आयोजित ऑफिस पार्टीदरम्यान सॉफ्टवेअर इंजिनिअरचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना तेलंगणात घडली. गंडला रामू असे मयत इंजिनिअरचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवला. पोलिसांनी सर्व सहकाऱ्यांचे जबाब नोंदवले असून पुढील तपास करत आहेत.
एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, रामू हा हैदराबादमधील रामंथपूर येथील एका सॉफ्टवेअर कंपनीत नोकरी करत होता. विकेंड निमित्त रामू आपला टीम लीडर आणि 15 सहकाऱ्यांसोबत तेलंगणाच्या यादद्री भुवनगिरी जिल्ह्यातील एका फार्महाऊसवर पार्टीला गेला होता. शनिवारी रात्री उशिरपर्यंत सर्वांनी पार्टी केली. मध्यरात्रीनंतर, रामू फार्महाऊसच्या आवारातील स्विमिंग पूलमध्ये बेशुद्ध अवस्थेत आढळला. त्याच्या सहकाऱ्यांनी त्याला तातडीने रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
घटनेची माहिती मिळताच चौतुप्पल पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. प्राथमिक तपासादरम्यान पोलिसांना मृत रामूच्या शरीरावर काही जखमा आढळून आल्या आहेत. यामुळे त्याच्या मृत्यूबाबत संशय निर्माण झाला आहे. घटनास्थळी सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने पोलिसांना घटनाक्रम पडताळणे कठिण झाले आहे. अधिक माहिती मिळवण्यासाठी तपास अधिकारी पार्टीला उपस्थित असलेल्या सर्व तरुणांची चौकशी करत आहेत.
याप्रकरणी मृत व्यक्तीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे आम्ही गुन्हा दाखल केला आहे. सर्व पैलूंची तपासणी केली जात असून, शवविच्छेदनाचा अहवाल मिळाल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे चौतुप्पलचे निरीक्षक एन. मनमधा राव यांनी सांगितले.
शरीरावर जखमा आढळल्यामुळे पोलीस सखोल तपास करत आहेत. पार्टीला उपस्थित असलेल्या सर्वांचे जबाब नोंदवले जात आहेत. मृत व्यक्तीचे वडील जी. अंजय्या यांनी दाखल केलेल्या तक्रारीत हत्येचा आरोप केल्यामुळे, पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. मृत्यूचे नेमके कारण निश्चित करण्यासाठी पोलीस फॉरेन्सिक आणि शवविच्छेदन अहवालाची वाट पाहत आहेत.


























































