
इराण आणि अमेरिकेमध्ये ऐतिहासिक शांतता करार होत असून 19 जून रोजी यावर स्वाक्षरी होणार आहे. यामुळे आखातात शांतता नांदेल असे वाटत असतानाच आता या करारावर इस्रायलने स्फोटक प्रतिक्रिया दिली आहे.
इस्रायल हे दुबळे राष्ट्र नाही. आम्ही अमेरिकेचे गुलाम नाही. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेला कोणताही करार आमच्यावर बंधनकारक असणार नाही. इस्रायल हे एक स्वतंत्र आणि सार्वभौम राष्ट्र असून आमच्या सुरक्षेचे निर्णय घेण्यास आम्ही सक्षम आहोत, असे म्हणत इस्रायलचे गृहमंत्री इतमार बेन ग्वीर यांनी इराण-इस्रायल कराराला केराची टोपली दाखवली.
अमेरिका आणि इराण यांच्यात होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली करण्यासाठी आणि युद्ध थांबवण्यासाठी एक प्राथमिक करार झाल्याची घोषणा डोनाल्ड ट्रम्प यांनी केली. पाकिस्तानच्या मध्यस्थीने झालेल्या या करारानुसार आगामी शुक्रवारी स्वित्झर्लंडमध्ये यावर अधिकृत स्वाक्षऱ्या होणार आहेत. या करारात लेबनॉनसह सर्व आघाड्यांवरील लष्करी कारवाया तातडीने आणि कायमच्या थांबवण्याची अट घालण्यात आली आहे. मात्र, इस्रायलला विश्वासात न घेता चाललेल्या या आंतरराष्ट्रीय घडामोडींवर इस्रायलचे सुरक्षा मंत्री कमालीचे संतापले आहेत.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एका प्रदीर्घ आणि अत्यंत जळजळीत पोस्टमध्ये बेन-ग्वीर यांनी इस्रायलची भूमिका स्पष्ट केली. आम्हाला अमेरिकेबद्दल आदर आहे आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे आम्ही आभारी आहोत. पण याचा अर्थ असा नाही की आम्ही आमच्या देशाची सुरक्षा आंतरराष्ट्रीय दबावापोटी गहाण ठेवू. भूतकाळात जेव्हा जेव्हा आम्ही परदेशी दबावापुढे झुकलो, तेव्हा तेव्हा इस्रायलला आपल्या नागरिकांच्या रक्ताची किंमत मोजावी लागली आहे, असे ते म्हणाले.
ההסכם של טראמפ אינו מחייב אותנו. ישראל לא כפופה לארצות הברית ואנחנו מדינה עצמאית וריבונית!
חובתנו לאזרחי ישראל לחיילי צה״ל ולעם היהודי וחובתנו ההיסטורית לנרדפים ולנרצחים היהודים באלפי שנות גלות, להעניק ביטחון ליהודים בארץ ישראל.
בכל פעם שנכנענו ללחץ בינלאומי על חשבון ביטחון…
— איתמר בן גביר (@itamarbengvir) June 15, 2026
हिजबुल्लाहचे पूर्णपणे उच्चाटन झाल्याशिवाय इस्रायल कोणत्याही कराराचा भाग बनणार नाही, असे बेन-ग्वीर यांनी स्पष्ट केले. तसेच युद्धात इस्रायली सैन्याने ताब्यात घेतलेल्या भूभागातून माघार घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. इस्रायलच्या उत्तर सीमेवरील नागरिकांच्या जिवाशी खेळणारा कोणताही मसुदा इस्रायल स्वीकारणार नाही, असा सज्जड दमही त्यांनी दिला. तसेच लेबनॉनमधून इस्रायलच्या दिशेने एक जरी ड्रोन किंवा क्षेपणास्त्र डागले गेले, तर इस्रायली वायू सेना थेट बैरूतच्या दाहियावर भीषण हल्ला करेल, असेही ते म्हणाले.
























































