Ratnagiri News – शेतामध्ये पेरणी झाली, कोंबही फुटले मात्र अद्याप पावसाची प्रतीक्षा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दाभोळे आणि आजुबाजूच्या परिसरामध्ये खरीप हंगामाची चाहूल लागताच शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने शेतात पेरणी केली. भाताची पिके जमिनीतून बाहेर पडून कोंब देखील आले आहेत. मात्र, पावसाच्या लहरीपणामुळे बळीराजा हवालदिल झाला आहे. जून महिना अर्ध्यावर आला तरी पावसाचा अद्याप पत्ता नसल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

शेतकऱ्यांनी पावसाच्या अपेक्षेने शेतात पेरणी केली. पेरणीनंतर पावसाने सपशेल पाठ फिरवली. पाऊस असाच लांबला तर शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवू शकते. त्यामुळे आर्थिक फटका बसण्याची दाट शक्यता आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असूनही आकाशात ढगांची दाटी होत नाही, उलट उन्हाळ्यासारखे कडकडीत ऊन पडत आहे. दिवसभरातून एखादी हलकी सरही न पडल्याने जमिनी तापल्या आहेत. केवळ पिकांचेच नुकसान होत नाही, तर पावसाअभावी पिण्याच्या पाण्याची टंचाई देखील जाणवू लागली आहे.

पावसाच्या या विलंबामुळे शेतकरी हताश झाला असून आकाशाकडे डोळे लावून बसला आहे. बळीराजाला आता फक्त दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. जेणेकरून पेरलेली पिके वाचतील आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.