
उत्तर प्रदेशातील उन्नाव जिल्ह्यातील पुजारी हत्याकांडातील मुख्य आरोपीचा सोमवारी पहाटे पोलीस चकमकीत मृत्यू झाला. या चकमकीत स्पेशल ऑपरेशन ग्रुपचा (SOG) एक कॉन्स्टेबलही जखमी झाला आहे. जखमी कॉन्स्टेबलला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी चकमकीच्या ठिकाणाहून .315 बोअरची गावठी पिस्तूल, दोन रिकामी काडतुसे आणि एक चाकू जप्त केला आहे.
पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, पोलीस आणि एसओजीचे पथक आग्रा-लखनौ एक्सप्रेसवेवरील एअरस्ट्रिपजवळील सर्व्हिस रोडवर तपासणी करत असताना ताजपूर गावाजवळील अंडरपासजवळ आरोपी इस्रायल लपल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे बांगरमऊ पोलीस आणि एसओजी कर्मचाऱ्यांच्या संयुक्त पथकाने घटनास्थळ गाठत आरोपीला घेराव घातला आणि त्याला शरणागती पत्करण्यास सांगितले.
शरणागती पत्करण्याऐवजी आरोपीने पोलिसांवर गोळीबार केला. यात एक गोळी सब-इन्स्पेक्टर न्यूटन कुमार सिंग यांच्या बुलेटप्रूफ जॅकेटला लागली, तर एसओजी कॉन्स्टेबल विकास भदौरिया यांच्या हाताला गोळी लागल्याने ते जखमी झाले, असे उन्नावचे पोलीस अधीक्षक जय प्रकाश सिंग यांनी सांगितले. पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात इस्रायल जखमी झाला. त्याला बांगरमऊ येथील सामुदायिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले, तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
संत राम मिलंद दास उर्फ बाबा मिलन दास यांच्या हत्याप्रकरणात इस्रायल हवा होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 9 जून रोजी उन्नाव जिल्ह्यातील बांगरमऊ भागात एका निर्माणाधीन मंदिरात अज्ञात हल्लेखोरांनी संत राम मिलंद दास उर्फ बाबा मिलन दास यांची चाकू भोसकून हत्या केली होती. या हत्याकांड प्रकरणात इस्त्रायल मुख्य आरोपी होता. घटनेनंतर तो फरार झाला होता. पोलीस त्याचा शोध घेत होते.

























































