
स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीच्या दीक्षांत समारंभात गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचे भाषण सुरू होताच, पॅलेस्टाईनचे समर्थन करणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांनी गोंधळ घातला. यावेळी त्यांनी पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ घोषणा देत कार्यक्रमातून वॉकआऊट केले. गुगलचे इस्रायली सरकारसोबत असलेल्या व्यावसायिक संबंधांचा निषेध करण्यासाठी विद्यार्थ्यांनी हे आंदोलन केल्याचे समजते.
सुंदर पिचाई यांनी याच नामांकित स्टॅनफोर्ड विद्यापीठातून ‘मटेरियल्स सायन्स अँड इंजिनीअरिंग’मध्ये एमएस (MS) पदवी पूर्ण केली आहे. रविवारी ते आपल्या याच माजी विद्यापीठात २०२६ च्या पदवीधारक बॅचला मुख्य अतिथी म्हणून संबोधित करण्यासाठी आले होते. विद्यापीठाच्या १३५ व्या दीक्षांत समारंभाला ३,६०० विद्यार्थ्यांसह २०,०० हून अधिक लोक उपस्थित होते. या कार्यक्रमात पिचाई यांनी जसे आपले भाषण सुरू केले, तसे पॅलेस्टाईन समर्थक विद्यार्थी, प्राध्यापक आणि पालकांमधून सुमारे 200 जण सभागृहातून बाहेर पडले.
प्रेक्षकांमध्ये उपस्थित असलेल्या काहींनी पिचाई यांच्या भाषणादरम्यान बॅनर दाखवले, शिट्ट्या वाजवल्या आणि पॅलेस्टिनी झेंडे फडकवले; त्यानंतर तेही भाषण अर्धवट सोडून निघून गेले.
२०२१ मध्ये गुगलने इस्रायलसोबत केलेल्या १.२ अब्ज डॉलर्सच्या क्लाउड-कंप्युटिंग कराराचा (‘प्रोजेक्ट निंबस’ – Project Nimbus) या विद्यार्थ्यांनी तीव्र विरोध केला. इस्रायल-गाझा युद्ध आणि विद्यापीठ प्रशासनाने पॅलेस्टाईन समर्थकांच्या आंदोलनांवर केलेली कारवाई, याविरोधात गेल्या तीन वर्षांत स्टॅनफोर्डमध्ये अशा प्रकारची ही तिसरी मोठी निदर्शने आहेत.
सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
या दीक्षांत समारंभाचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. सुंदर पिचाई भाषण करत असताना विद्यार्थी हातामध्ये पॅलेस्टिनी झेंडे आणि फलक घेऊन ‘फ्री पॅलेस्टाईन’ (Free Palestine) अशा घोषणा देत बाहेर पडताना या व्हिडिओमध्ये दिसत आहेत.
























































