
अमेरिका आणि इराण यांच्यात गेल्या चार महिन्यांहून अधिक काळ सुरू असलेले युद्ध संपवण्याबाबत दोन्ही देशांमध्ये एकमत झाले आहे. आखातातील या सकारात्मक घडामोडींमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण झाली असली तरी मौल्यवान धातूंच्या किमती मात्र वाढल्या आहेत. देशांतर्गत बाजारपेठेत आज सलग तिसऱ्या दिवशी सोने आणि चांदीच्या दरात मोठी तेजी पाहायला मिळाली.
सुरुवातीच्या व्यवहारात चांदीच्या दरात तब्बल 7,200 रुपयांची, तर सोन्याच्या दरात 3,300 रुपयांची वाढ झाली. गेल्या अवघ्या तीन दिवसांत चांदी 18,000 रुपयांनी तर सोने 6,000 रुपयांनी महागले आहे. त्यामुळे सोने-चांदी खरेदीसाठी सराफा बाजारात जाण्यापूर्वी नवीन दर नक्कीच जाणून घ्या.
सोमवारी बाजार उघडताच सोन्याचे दर 3301 रुपयांनी वाढून प्रति 10 ग्रॅमचा दर 1 लाख 53 हजार 829 रुपयांवर पोहोचला. बाजार स्थिरावल्यावर हे दर 1 लाख 53 हजार 245 रुपयांवर आले. तर दुसरीकडे 3 जुलैची डिलिव्हरी असलेल्या चांदीच्या दरातही प्रति किलो 7,200 रुपयांची वाढ झाली. त्यामुळे चांदीचा दर 2 लाख 52 हजार 486 वर गेला.
दरम्यान, वायदा बाजाराप्रमाणेच किरकोळ सराफा बाजारातही सोने-चांदीचे दर गगनाला भिडले आहेत.
- 24 कॅरेट सोनं – 1,51,680 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि 15,168 रुपये प्रति ग्रॅम
- 22 कॅरेट सोनं – 1,39,050 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि 13,905 रुपये प्रति ग्रॅम
- 18 कॅरेट सोनं – 1,13,800 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि 11,380 रुपये प्रति ग्रॅम
आंतरराष्ट्रीय बाजारातही तेजी
जागतिक पातळीवरही मौल्यवान धातूंना मोठी मागणी आल्याचे दिसून येत आहे. स्पॉट गोल्ड 2 टक्क्यांच्या वाढीसह 4,304.11 डॉलर प्रति औंसवर पोहोचले. 9 जूननंतरचा हा सोन्याचा सर्वोच्च स्तर आहे. तर ऑगस्टची डिलिव्हरी असणारे यूएस गोल्ड फ्युचर 2 टक्के वाढीसह 4,325.20 डॉलर वर व्यवहार करत आहे. स्पॉट सिल्वर 3.1 टक्क्यांच्या तेजीसह 70.07 डॉलर प्रति औंसवर पोहोचली आहे.




























































