
तृणमूल काँग्रेसमधून फुटलेल्या 20 खासदारांचा गट त्रिपुरामधील नॅशनलिस्ट सिटीझन्स पार्टी ऑफ इंडियामध्ये (एनसीपी) विलीन झाला आहे. यावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. विलीन होणे हाच पक्षांतराला एकमेव पर्याय असून तृणमूल काँग्रेसच्या बंडखोर खासदारांचे जे झाले तेच महाराष्ट्रात शिंदे गटासोबत व्हायला हवे होते, असे राऊत सोमवारी मुंबईत माध्यमांशी बोलताना म्हणाले.
टीएमसीच्या बंडखोर खासदारांच्या विलीनीकरणाबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, नॅशनलिस्ट सिटीझन्स पार्टी ऑफ इंडिया या पक्षाचे नाव तरी आपण कधी ऐकले आहे का? ही त्रिपुरातील पार्टी असून या पक्षाला तिथे 862 मते मिळाली होती. पश्चिम बंगालमध्ये ते काही जागा लढले आणि तिथे सर्वांचे डिपॉझिटही जप्त झाले. अमित शहा कुठून कुठून पार्ट्या निर्माण करतात आणि पटलावर आणतात. एखाद्या गुलांना हातापायात बेड्या बांधून कोठडीत ढकलावे तसे या सर्वांना अस्तित्व नसलेल्या पार्टीत ढकलले.
तृणमूलचे खासदार भारतीय जनता पक्षात जायला निघाले होते. पण अमित शहांनी त्यांना त्रिपुरातील नॅशनलिस्ट सिटीझन्स पार्टी ऑफ इंडिया या पक्षात ढकलले. बंडखोरांचा गट विलीन झाल्यामुळे आता तृणमूल काँग्रेस पक्षावरील आणि चिन्हावरील त्यांचा दावा संपलेला आहे. महाराष्ट्रातही हेच व्हायला हवे होते. विलीन होणे हाच पक्षांतराचा एकमेव पर्याय आहे. महाराष्ट्रात स्वत:ला शिवसेना म्हणून घेणारा गट बेकायदेशीर असल्याचे आम्ही म्हणतो ते यासाठीच, असेही राऊत म्हणाले.
ममतांचे 20 खासदार भाजपच्या तंबूत, बंडखोरांचा गट नॅशनलिस्ट सिटीझन्स पार्टीत विलीन
तृणमूलचे 60 पेक्षा जास्त आमदार आणि 20 पेक्षा जास्त खासदार फुटले आहेत. तरीही त्यांना एका पक्षामध्ये विलीन व्हावे लागले. महाराष्ट्रात तुलनेने कमी आकडा असतानाही शिंदे गट शिवसेना म्हणून मिरवतोय, हे दुर्दैवी आहे. याचे कारण असे आहे की, महाराष्ट्राच्या नेत्यांचा दिल्लीमध्ये पैशांचा ओघ जास्त गेला. पश्चिम बंगालमध्ये तुलनेने गरीब राजकारणी असल्यामुळे, तिथे एकनाथ शिंदे नसल्याने, समृद्धी महामार्ग निर्माण झाला नसल्याने किंवा ते दिल्लीत किंवा न्यायव्यवस्थेत, निवडणूक आयोगात पैशांचा ओघ वाहू शकले नाहीत. जर त्यांच्याकडे पैसे असते आणि पैशांचा वापर झाला असता तर तृणमूल काँग्रेस पक्ष आणि चिन्हही त्यांना मिळाले असते, असेही राऊत म्हणाले.
दोन्हीकडे वेगळा न्याय
शिंदे गट फुटला त्या पहिल्या दिवसापासून आमची कायदेशीर लढाई सुरू झाली आणि आम्हाला विजय मिळायला हवा होता. तृणमूल फुटेपर्यंत वाट बघायची गरज नव्हती. तृणमूलच्या आमदारांनी, खासदारांची त्यांची आमदारकी, खासदारकी वाचवण्यासाठी ज्या पक्षाचे अस्तित्वच नाही त्या पक्षात प्रवेश केला. मात्र इथे मूळ शिवसेना, चिन्ह दिले. मूळ राष्ट्रवादी आणि चिन्ह दिले. ही देशाच्या न्यायव्यवस्थेतील, कायद्यातील आणि निवडणूक आयोगातील तफावत आहे, अशी टीकाही संजय राऊत यांनी केली.
























































