फक्त एमएच – 09 गाड्या; कोल्हापुरात बाहेरील वाहनांना प्रवेश कर, महापालिकेच्या प्रस्तावाविरोधात तीव्र संताप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
kolhapur-municipal-corporation-proposes-entry-tax-on-outside-vehicles-except-mh-09-public-outrage

महापालिकेने शहरात येणाऱ्या कोल्हापूरबाहेरील वाहनांसाठी ‘प्रवेश कर’ घेण्याचा ठराव सर्वसाधारण सभेसमोर आणला आहे. या निर्णयाला जोरदार विरोध होत आहे. महापालिकेच्या मनमानीबद्दल सर्वच स्तरातून संतापाचा सूर उमटत आहे.

करवीरनगरीत येणाऱया पर्यटकांच्या आणि बाहेरील वाहनांच्या संख्येत प्रचंड वाढ होत आहे. त्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर महापालिका क्षेत्रात प्रवेश करणाऱया ‘एमएच 09’ म्हणजेच कोल्हापूर जिल्हा पासिंगच्या वाहनांव्यतिरिक्त इतर सर्व वाहनांवर ‘प्रवेश कर’ (एंट्री टॅक्स किंवा युजर फी) आकारण्यात यावा असा ठराव नगरसेवकांनी दाखल केला आहे. महापालिका प्रशासनाने त्यासंदर्भात सविस्तर प्रस्ताव तयार करावा, अशी मागणी केली असून 17 जून रोजी महासभेत त्यावर निर्णय होणार आहे. महासभेने हिरवा कंदील दाखवल्यास प्रशासनाकडून प्रस्ताव तयार होऊन कोल्हापुरात येणाऱया परजिह्यातील आणि परराज्यातील वाहनांना प्रवेश कर लागू केला जाणार आहे.

केवळ कोल्हापूर जिह्यातील (एमएच-09) वाहनांना या करामधून पूर्णपणे वगळण्यात येणार आहे. मात्र पुणे, मुंबई, सांगली, सातारा किंवा कर्नाटकसह इतर कोणत्याही भागांतून येणाऱया व्यावसायिक आणि खासगी वाहनांवर हा कर लागू केला जाईल.

हा प्रस्ताव एकतर्फी व अन्यायकारक आहे, अशी टीका करत याला जनता दल (धर्मनिरपेक्ष), स्वाभिमाने शेतकरी संघटना, हिंदू एकता आंदोलन, कॉमन मॅन संघटनांकडून तीव्र विरोध करण्यात आला आहे. हा निर्णय मागे न घेतल्यास संघटनांनी आंदोलनाचा इशाराही दिला आहे.

लवकरच बैठक घेऊ

शहराच्या विकासासाठी अशा पद्धतीने निधी उपलब्ध होत असेल, तर त्याचा विचार होऊ शकतो. हा प्रस्ताव सदस्यांनी आणला आहे. त्यावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. यासंदर्भात बैठक घेऊ, असे पालकमंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले.

जनतेला लुटण्याचा नवा फंडा

महापालिकेने अत्यंत चुकीचा निर्णय घेतला आहे. केंद्र आणि राज्य सरकार आधीच ‘जीएसटी’च्या माध्यमातून जनतेकडून मोठी करवसुली करत आहे. महापालिकेनेही जनतेला लुटण्यासाठी हा नवा फंडा शोधून काढला आहे. जनतेवर टोलचा भार टाकण्यापेक्षा महापालिकेतील अधिकारी आणि पदाधिकाऱयांनी आपली टक्केवारी आणि भ्रष्टाचार थांबवावा, अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली. तसेच याविरोधात आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला.