
महावितरणच्या वतीने ठिकठिकाणी स्मार्ट मीटर बसवण्याची मोहीम सध्या सुरू आहे. मात्र त्यास स्थानिकांनी विरोध केला असून ठाण्याच्या लोकमान्यनगर-सावरकरनगरमध्येदेखील अशा प्रकारचे मीटर्स बसवले जात आहेत. त्याविरोधात सह्यांची मोहीम राबवण्यात आली. त्याला स्थानिकांनी भरघोस प्रतिसाद दिला. कोणत्याही परिस्थितीत स्मार्ट मीटरची सक्ती केल्यास शिवसेना मोठे आंदोलन छेडेल, असा इशारा देण्यात आला आहे.
सावरकरनगर-लोकमान्यनगर येथे महावितरणचे कर्मचारी दुपारच्या वेळेस येतात आणि कोणतीही पूर्वकल्पना न देता विजेचे जुने मीटर काढून नवे बसवले जात आहेत. ही बाब समजताच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे विभागप्रमुख राजू शिरोडकर व शहर संघटक प्रमिला भांगे यांच्या पुढाकाराने महावितरणच्या दादागिरीविरोधात शनिवारी सह्यांची मोहीम राबवण्यात आली. महावितरणचे कर्मचारी स्मार्ट मीटर लावण्यासाठी सक्ती करत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला.
मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनाचे काय झाले?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुठेही स्मार्ट मीटरची सक्ती केली जाणार नाही, असे आश्वासन दिले होते. मग स्थानिक पातळीवर जबरदस्तीने हे मीटर्स का लावत आहेत, असा संतप्त सवाल राजू शिरोडकर यांनी केला आहे. यासंदर्भात स्थानिकांसह शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकारी अभियंता तोडकर यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले आहे.


























































