“तुकाराम मुंडे यांची बदली सरकारने करू नये, अन्यथा…”, मनोज जरांगे पाटील यांचा इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या धडाकेबाज कारवाया चालू असून, ते भेसळ करणाऱ्यांना नीट करतील. तुकाराम मुंडे यांच्या बदलीच्या भानगडीत सरकारने पडू नये, अन्यथा सरकारच्या विरोधात उभे राहू, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.

मनोज जरांगे पाटील हे कोल्हापूरकडे जात असताना कळंब शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले की, अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे हे अत्यंत चांगले काम करत आहेत. त्यांनी भेसळयुक्त अन्नपदार्थांविरोधात सुरू केलेल्या कारवाईमुळे सर्वसामान्य नागरिकांचे आरोग्य सुरक्षित राहणार असून, शेतकऱ्यांच्या दुधालाही योग्य भाव मिळण्यास मदत होईल.

सरकारने तुकाराम मुंडे यांच्या बदलीचा विचारही करू नये. जर त्यांच्या बदलीचा प्रयत्न झाला, तर आम्ही सरकारच्या विरोधात उभे राहू, असा इशाराही त्यांनी दिला. तसेच मुंडे यांनी सुरू केलेल्या कारवाईचे कौतुक करत त्यांच्या कार्याला पाठिंबा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी न देता कर्जमुक्ती केली पाहिजे, त्यामुळे वारंवार शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याची वेळ येणार नाही, शेतीमालाला भाव दिल्यावर शेतकरी पुन्हा कर्ज काढणार नाही, पंढरपूर येथे आमदार रोहित पवार हे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरती आंदोलन करत आहेत. आपण शेतकऱ्यांची लेकरं आहोत, शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आंदोलन कोणाचेही असले तरी त्यामध्ये सहभागी झाले पाहिजे, सरकारने केवळ कर्जमाफी न करता शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती द्यावी, अशी मागणीही यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी केली.

कोल्हापूर आणि सातारा गॅझेटच्या अंमलबजावणीसाठी आंदोलन करण्याची वेळ राज्य सरकार येऊ देणार नाही, असा विश्वास मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केला. यासंदर्भात ते कोल्हापूरचे खासदार यांची भेट घेणार आहेत. यावर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले की, या विषयात आता केवळ औपचारिकता बाकी असून, सरकार कोणतेही आंदोलन होऊ न देता गॅझेटची अंमलबजावणी करेल, असा आम्हाला विश्वास आहे.