दिल्ली डायरी – काँगेस कात टाकतेय, पण…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>नीलेश कुलकर्णी 

विधान परिषद राज्यसभेसाठी भाजपमध्ये खोक्यांचे राजकारण सुरू असताना राहुल गांधी यांनी घेतलेल्या राजकीय भूमिकेमुळे त्यांचे वेगळेपण अधोरेखित होत आहे. विशेषतः राज्यसभेचे उमेदवार देताना त्यांनी राजकीय धाडस दाखविले. काँग्रेस कात टाकत आहे, पण राहुल गांधी यांना आता पक्षातील जयचंदांना ठीक करावे लागेल. राहुल गांधी ते करतात का? यावर पुढची समीकरणे अवलंबून असतील.

राहुल गांधी लोकसभेतील विरोधी पक्षनेते झाल्यापासून गांभीर्याने राजकारण करत आहेत. जनहिताचे मुद्दे मांडून राहुल सरकारला सळो की पळो करून सोडत आहेतच, त्याचवेळी पक्षातील संघटनात्मक पातळीवरही लक्ष घालत आहेत. पक्षातल्या ढुढ्ढाचार्यांना बाजूला सारून त्यांनी नव्या नेतृत्वाला संधी द्यायला सुरुवात केली आहे. केरळमच्या मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर राहुल गांधी आपल्या सगळ्यात खासमखास असलेल्या के. सी. वेणुगोपाल यांना सहज बसवू शकले असते. मात्र जनमत व आमदारांच्या मतांचा आदर करत त्यांनी सतीशन यांना मुख्यमंत्रीपदाची संधी दिली. तीच बाब कर्नाटकाची. वयोवृद्ध सिद्धरामय्या यांना आता हटवले नाही, तर कर्नाटकची सत्ता हातची जाईल, हे लक्षात येताच राहुल गांधी यांनी कर्नाटकात शिवकुमार यांना मुख्यमंत्रीपदी बसवले. राज्यसभा निवडणुकीतही राहुल गांधी यांच्या निर्णयामुळे वर्षानुवर्षे 24 अकबर रोड व राज्यसभेत ठाण मांडून बसलेल्या नेत्यांना वळकटी गुंडाळून मार्गस्थ व्हावे लागले आहे. मध्य प्रदेशातून दिग्विजय सिंग व कमलनाथ या दोन माजी मुख्यमंत्र्यांची राज्यसभेची दावेदारी मोडीत काढत राहुल गांधी यांनी मीनाक्षी नटराजन यांना संधी दिली. मात्र निवडणूक आयोग व काँगेसमधील अंतर्गत राजकारणाने मीनाक्षी यांच्यासारख्या समर्पित कार्यकर्तीचा राजकीय बळी घेतला, हे दुर्दैवच. मात्र तरीही गेल्या पन्नासहून अधिक वर्षे कोणत्या ना कोणत्या पदावर ठाण मांडून बसलेल्या कमलनाथ व त्यांच्या परिवाराला खडय़ासारखे दूर करण्याची हिंमत राहुल गांधी यांनी दाखविली, त्याबद्दल ते काwतुकास पात्र ठरावेत! उतारवयातही राज्यसभेवर जाण्याची इच्छा असलेल्या दिग्विजय सिंग यांना राहुल यांनी व्हीआरएस घ्यायला भाग पाडले. झारखंडमध्ये प्रणव झा यांच्यासारख्या अनेक वर्षांपासून काँग्रेसमध्ये कार्यरत असलेल्या सच्च्या कार्यकर्त्याला राज्यसभेची संधी दिली. विधान परिषद व राज्यसभेसाठी भाजपमध्ये खोक्यांचे राजकारण सुरू असताना राहुल गांधी यांनी घेतलेल्या राजकीय भूमिकेमुळे त्यांचे वेगळेपण अधोरेखित होत आहे. राजस्थानातून माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत राज्यसभेवर जाण्यास इच्छुक होते. मात्र राहुल गांधी यांनी त्यांच्या नावावर चक्क फुली मारत नीरज डांगी यांना संधी दिली. कर्नाटकमधून मन्सूर अली या कार्यकर्त्याला संधी दिली.

नरेंद्र मोदी सरकारला नुकतीच 12 वर्षे पूर्ण झाली. मोदींच्या या कार्यकाळात काँगेस विलक्षण संक्रमणावस्थेतून गेली. गोदी मीडिया व सोशल मीडियाच्या वावटळीत काँग्रेसचे विलक्षण चारित्र्यहनन झाले. या आक्रमक नरेटिव्ह व पर्सेप्शनला प्रत्युत्तर देण्याचे बळही काँग्रेसमध्ये उरले नाही. त्यातच काँग्रेसमधील काही दुढ्ढाचार्य हे भाजपचेच ‘स्लीपर सेल’ म्हणून काम करायचे. या मंडळींना कसे दूर करायचे? हाही प्रश्नच होता. सलग दोन लोकसभेत सपाटून मार खाल्ल्यानंतर काँग्रेसचे पुढे काय होणार, हा मोठा गंभीर प्रश्न होता. मात्र 2024 मध्ये मोदींचे बहुमत हुकले आणि काँग्रेसला एकप्रकारे तरतरी आली. राहुल गांधी लोकसभेचे विरोधी पक्षनेते बनणे, त्यांच्या साथीला प्रियंका गांधी संसदीय राजकारणात येणे ही काँग्रेससाठी नवी नांदी ठरली. काँगेसमध्ये पूर्वी निर्णयच होत नव्हते. निर्णय झाले तरी ते परस्पर फिरविणारे एक टोळके 24 अकबर रोडवर असायचे. काँग्रेसमधून कधी दिग्विजय सिंग, कमलनाथ व अशोक गेहलोत यांच्यासारखे नेते बेदखल होतील, याचा कुणी विचारही केला नव्हता. राहुल गांधी यांनी धडाकेबाज निर्णय घेऊन ही किमया करून दाखवली आहे. ‘काँग्रेसचा पराभव काँग्रेसच करते,’ असे नेहमीच म्हटले जाते. राहुल गांधी यांनी मध्य प्रदेशातून मीनाक्षी नटराजन यांचे नाव पुढे करताच, त्यांना तेलंगणामध्ये आलेल्या एका नोटिशीची माहिती दिग्विजय सिंग यांना तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांनी पुरवली व दिग्विजय यांनी ती पुढे भाजपचे मुख्यमंत्री मोहन यादव यांच्यापर्यंत पोहोचविल्याची जोरदार चर्चा ऐकायला मिळते. काँग्रेस अंतर्गत कुरघोडय़ांच्या ‘रंजक इतिहास’ पाहता ही शक्यता अगदीच नाकारता येत नाही. त्यामुळेच काँग्रेस कात टाकत आहे, पण राहुल गांधी यांना आता पक्षातील ‘जयचंदां’ना ठीक करावे लागेल. राहुल गांधी ते करतात का? यावर पुढची समीकरणे अवलंबून असतील.

प्रियांक खरगेंचे प्रमोशन

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंचे चिरंजीव प्रियांक खरगे यांची कर्नाटकच्या गृहमंत्रीपदी नियुक्ती करून नवे मुख्यमंत्री शिवकुमार यांनी एका दगडात अनेक पक्षी मारले आहेत. काँग्रेसच्या कर्नाटकच्या राजकारणात बाप-लेक गृहमंत्री होण्याचा अनोखा विक्रम नोंदवला गेला आहे. कर्नाटक काँग्रेसमध्ये मल्लिकार्जुन खरगे हे सिद्धरामय्यांचे गॉडफादर मानले जातात. सिद्धरामय्या यांना मुख्यमंत्रीपदावरून हटविले जाऊ नये, यासाठी खरगेंनी अखेरपर्यंत प्रयत्न केले. मात्र राहुल गांधी शिवकुमार यांच्या नावावर अडून बसल्यामुळे खरगेंचा नाईलाज झाला. कायमच सिद्धरामय्यांची पाठराखण करणाऱ्या मल्लिकार्जुन सुपुत्रास गृहमंत्री बनवून शिवकुमार यांनी ‘मल्लिकार्जुन कृपा’ प्राप्त केली. त्याचबरोबर राज्यातील एक दलित नेते परमेश्वरा यांना उपमुख्यमंत्री केले. मात्र त्यांच्याकडचे गृहखाते काढून घेतले. त्यातून खरगे व परमेश्वरा यांच्यात शिवकुमार यांनी कलगीतुरा लावून दिला आहे. प्रियांक यांना हाताशी धरून सिद्धरामय्यांनी कर्नाटकात दलित-कुरबा-मुस्लिम सामाजिक समीकरण बनवून लिंगायत व वक्कलिंग या प्रबळ जातींना आव्हान दिले होते. आता प्रियांक यांना गळाशी लावल्याने हे समीकरण मोडीत काढण्याचे शिवकुमार यांचे मनसुबे यशस्वी होण्याची शक्यता आहे. राजकारणात कोणी कोणाचा कायमचा मित्र व कायमचा शत्रू नसतो, हेच खरे. कर्नाटकातले ‘सत्तेचे नाटक’ तरी हाच संदेश देताना दिसते.

सुखद समावेश

पश्चिम बंगालमध्ये प्रचंड बहुमताने सत्तेवर येण्यासाठी भाजपने साम-दाम-दंड-भेदाचा, केंद्रीय यंत्रणांचा वारेमाप वापर केला, दमनतंत्र वापरले. देशात सध्या सगळीकडेच खोक्यांचे, ठोक आयात-निर्यातीचे व्यापारी राजकारण आणि नातेवाईकशाही पह्फावलेली असताना अशा काळ्याकुट्ट निराशाजनक वातावरणात बंगालमध्ये कविता माझी यांनी लोकशाहीला सुखावणारा एक दिवा पेटवला आहे. बंगालच्या सुवेंदू अधिकारी यांच्या मंत्रिमंडळात मंत्री होईपर्यंत कविता माझी फारशा कोणाला माहिती नव्हत्या. मात्र अनेकांच्या घरी धुणीभांडी करणाऱ्या, महिना अडीच हजार एवढी तुटपुंजी कमाई असणाऱ्या कविता माझी या मंत्री झाल्या ही आश्चर्याची बाब म्हणावी लागेल. स्वातंत्र्योत्तर काळात अशा कहाण्या भारतीय राजकारणात ‘प्रेरक कथा’ असायच्या. सध्याच्या काळात अशी उदाहरणे दुर्मिळ आहेत. कविता माझी यांच्यासोबत माजी क्रिकेटपटू अशोक डिंडा हेदेखील मंत्री झाले आहेत. क्रिकेटमध्ये अशोक डिंडा हे महागडे गोलंदाज म्हणून ओळखले जायचे. एखाद्या बॉलरला मार पडला की, ‘डिंडा अपॅडमीचे प्रॉडक्ट्’ म्हणून त्याला टोमणे मारले जायचे. मात्र डिंडा महाशय क्रिकेटमध्ये बॉलिंगमध्ये मार पडला तरी राजकारणात मात्र यशस्वी ठरले आहेत. त्यांनी मंत्रीपदाचा थेट सिक्सर लगावला आहे.

[email protected]