बंदी जॅकेटला मान्यता, परेडमध्ये तलवार ऐच्छिक; लष्कराचा ‘देसी’ लुक, ब्रिटिशकालीन परंपरांना रामराम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
indian-army-adopts-desi-look-approves-bandi-jacket-makes-swords-optional-ends-british-traditions

भारतीय लष्कराने वसाहतकालीन परंपरांपासून दूर जात आपल्या ड्रेसकोडमध्ये महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. औपचारिक प्रसंगी अधिकाऱ्यांना आता पारंपरिक भारतीय शैलीतील ‘बंदी जॅकेट’ परिधान करण्याची परवानगी देण्यात आली आहे. यासोबतच पाऊच बेल्टचा वापर कमी करण्यात आला असून संचलनादरम्यान पाहणी करणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी तलवार बाळगणे ऐच्छिक करण्यात आले आहे.

हे सर्व बदल ‘आर्मी युनिफॉर्म्स-2026’ या नव्या 174 पानी नियमावलीत समाविष्ट करण्यात आले आहेत. आठ वर्षांनंतर प्रकाशित झालेल्या या नियमावलीत देशी ओळख अधिक ठळक करण्यासाठी आणि ब्रिटिशकालीन परंपरा दूर करण्यासाठी अनेक सुधारणा करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे. लष्कराच्या मते हे बदल लष्कराची प्रतिष्ठा, कार्यक्षमता आणि परंपरा जपत आधुनिक भारतीय विचारांशी सुसंगत आहेत.

नवीन नियमांनुसार आता तलवार केवळ परेड कमांडर, कंटिंजेंट कमांडर आणि काही विशिष्ट अधिकारीच ठेवू शकतील. विशेषतः प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्य दिन, सेना दिन आणि गार्ड ऑफ ऑनर यांसारख्या प्रमुख समारंभांमध्ये तिचा वापर केला जाईल. नवीन मार्गदर्शक तत्त्वांमध्ये स्पष्टपणे नमूद केले आहे की, रिह्यूइंग अधिकारी परेडदरम्यान तलवार ठेवणार नाहीत.

पहिल्यांदाच औपचारिक नागरी पोशाखात स्वदेशी बंदी जॅकेटचाही समावेश करण्यात आला आहे. बंद गळ्याचे बंदी जॅकेट, पूर्ण बाह्यांच्या शर्ट, औपचारिक पॅण्ट आणि बंद शूजसोबत परिधान करता येईल. यापूर्वी लष्कराने फेब्रुवारी 2023 मध्येही अनेक जुन्या परंपरा रद्द केल्या होत्या.

महिला अधिकाऱयांसाठीही पोशाखाचे नियम स्पष्ट करण्यात आले आहेत. त्यांना साध्या रंगाची साडी किंवा कुर्ता-सलवारसोबत सरळ पॅण्ट आणि दुपट्टा वापरण्याची परवानगी आहे. मात्र स्लीव्हलेस कुर्ते, पलाझो किंवा सिगारेट पॅण्टसारख्या कॅज्युअल पोशाखांवर बंदी घालण्यात आली आहे.

सैनिकांना परवानगीशिवाय दाढी ठेवणे, विचित्र हेअरस्टाईल, दिसणारे इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स, टॅटू, बॉडी पियार्ंसग आणि मेकअप करण्यास बंदी असेल.

यासोबतच लष्कराशी संबंधित अधिकारी आणि जवानांना राजकीय, धार्मिक किंवा निषेध सभा, विवाह सोहळे, खासगी पाटर्य़ा आणि सशुल्क मीडिया कार्यक्रमांमध्ये परवानगीशिवाय गणवेश परिधान करून जाण्याची परवानगी नसेल.