
ओमानच्या किनाऱ्याजवळ हिंदुस्थानी खलाशी असलेले जहाज बुडाले. जहाज बुडत असल्याचे लक्षात येताच अरबी समुद्रात मोठी बचाव मोहिम राबवण्यात आली. अमेरिकेच्या गस्तीवर असलेल्या विमानाने तात्काळ लाइफ राफ्ट समुद्रात फेकली आणि 14 हिंदुस्थानी खलाशांचे प्राण वाचवले.
इंडिया टीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, ओमानमधील रास अल हद्दपासून सुमारे 80 सागरी मैल अंतरावर हिंदुस्थानी खलाशी असलेले धो ‘एमएसव्ही विराट 1’ (MSV Virat 1) हे बुडू लागले. यादरम्यान अमेरिकन नौदलाच्या ‘पी-8’ (P-8) या सागरी गस्त घालणाऱ्या विमानाने त्वरित प्रतिसाद दिला. जहाजातील कर्मचाऱ्यांसाठी तात्काळ एक लाइफ राफ्ट खाली टाकली आणि आकाशातून परिस्थितीवर लक्ष ठेवले. सर्व 14 खलाशी सुरक्षितपणे ‘लाइफ राफ्ट’वर चढल्याची खात्री केली.
संकटाचा इशारा मिळताच, बचाव कार्यात मदत करण्यासाठी हिंदुस्थानी नौदलाची जहाजे त्वरित घटनास्थळाकडे वळवण्यात आली. दरम्यान, ‘सेंट किट्स अँड नेव्हिस’चा ध्वज असलेले व्यापारी जहाज ‘एमव्ही जबल अली 9’ (MV Jabal Ali 9) यानेही आपला मार्ग बदलत घटनास्थळाकडे वळले. ‘एमव्ही जबल अली 9’ कडून मिळालेल्या माहितीनुसार, सर्व 14 हिंदुस्थानी खलाशी सुरक्षित असून ते ‘लाइफ राफ्ट’वर आहेत; बचाव पथके घटनास्थळाकडे रवाना झाली आहेत.

























































