
बिहारमधील प्रसिद्ध ज्ञानबिंदू अकॅडमीचे संचालक रोशन आनंद यांचे बंधू प्रिन्स यादव यांचा नेपाळमध्ये संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नेपाळमधील विराटनगर येथील एका हॉटेलमध्ये प्रिन्स यांचा मृतदेह आढळून आला. या प्रकरणी नेपाळ पोलिसांनी या प्रकरणी पाच संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे.
प्रिन्स यादव हे ज्ञानबिंदू अकॅडमीच्या व्यवस्थापन आणि प्रशासकीय कामांची जबाबदारी सांभाळत होते. काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध शिक्षक फैजल खान उर्फ खान सर यांच्या खान ग्लोबल स्टडीज या कोचिंग क्लाससोबत ज्ञानबिंदू अकॅडमीचा मोठा वाद झाला होता. या वादातून खान सरांच्या कोचिंग क्लासवर हल्ला झाला होता. या प्रकरणी रोशन आनंद आणि प्रिन्स यादव यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला होता. या कारवाईत पोलिसांनी रोशन आनंद यांना अटक केली होती, तर अटक टाळण्यासाठी प्रिन्स यादव नेपाळला पळून गेला होता.
नेपाळमध्ये लपून बसलेला असतानाच विराटनगर येथील एका हॉटेलमध्ये प्रिन्स याचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत सापडला. नेपाळ पोलिसांनी तातडीने मृतदेह ताब्यात घेऊन तो शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. प्राथमिक तपासामध्ये मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. मात्र, घातपाताचा संशय व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी हॉटेलमधील आणि परिसरातील 5 लोकांना ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे. ‘टाइम्स ऑफ इंडिया‘ने याबाबत वृत्त दिले आहे.
दरम्यान, रोशन आनंद आणि प्रिन्स यादव हे मूळचे बिहारच्या सहरसा जिल्ह्यातील धमसैना गावचे रहिवासी आहेत. प्रिन्सच्या मृत्यूची बातमी येताच संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या निवासस्थानी गावकऱ्यांची प्रचंड गर्दी झाली आहे. आता प्रिन्स यादव यांच्या शवविच्छेदन अहवालानंतरच त्यांच्या मृत्यूचे खरे कारण समोर येईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे.
























































