पुणे, छत्रपती संभाजीनगरमध्ये महाविकास आघाडीची सरशी! नागपूरमध्ये काँग्रेस-भाजपमध्ये अटीतटी; अमरावती, पुणे शिक्षकमध्ये महायुतीत चुरस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या पाच जागांसाठी झालेल्या निवडणुकीत सर्वच ठिकाणी रंगतदार लढत होताना दिसत आहेत. मतमोजणीच्या पहिल्या फेरीत पुणे आणि छत्रपती संभाजीनगर पदवीधरमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी आघाडी घेतली आहे. तर नागपूर पदवीधरमध्ये काँग्रेस-भाजप उमेदवारांत अटीतटीची लढत होत आहे. अमरावती आणि पुणे शिक्षकमध्ये महायुतीचे अधिकृत उमेदवार आणि बंडखोरांत चुरशीचा सामना सुरू आहे.

महाराष्ट्र विधान परिषदेच्या 3 पदवीधर आणि 2 शिक्षक मतदारसंघांसाठी शुक्रवारी पार पडलेल्या निवडणुकीच्या मतमोजणी प्रक्रियेला आज सकाळी 8 वाजल्यापासून सुरुवात झाली. या निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा थेट सामना होत असून काही मतदारसंघात मैत्रीपूर्ण लढती होत असल्याने कुणाला धक्का बसणार आणि कोण बाजी मारणार, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. मतमोजणीच्या सुरुवातीच्या कलानुसार छत्रपती संभाजीनगरमध्ये राष्ट्रवादीकडून अजितदादा गटाला  जोरदार धक्का बसण्याची शक्यता आहे. पुणे पदवीधरसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या हर्षदा देशमुख आणि भाजपच्या स्मिता जाधव यांच्यात अटीतटीचा सामना होत आहे. पहिल्या फेरीत हर्षदा देशमुख यांनी आघाडी घेतली आहे.

पुणे शिक्षकमध्ये भाजप उमेदवार पुढे

पुणे शिक्षकमध्ये भाजपचे उमेदवार कौस्तुभ गावडे पहिल्या फेरीत सर्वात पुढे आहेत. दुसऱ्या स्थानी अपक्ष उमेदवार माजी आमदार दत्तात्रय सावंत आणि शिंदे गटाचे सचिन सानप यांच्यात टक्कर सुरू आहे, तर विद्यमान आमदार काँग्रेसचे जयंत आजगावकर पिछाडीवर पडले आहेत.

नागपूरमध्ये काँग्रेस उमेदवाराची आघाडी

नागपूर पदवीधरमध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये अटीतटीचा सामना होत आहे. काँग्रेसचे विद्यमान आमदार अभिजित वंजारी यांनी भाजपचे उमेदवार सुधाकर कोहळे यांच्यावर पहिल्या फेरीत आघाडी घेतली आहे. राष्ट्रवादीचे बंडखोर अपक्ष उमेदवार नितेश कराळे तिसऱ्या क्रमांकावर आहेत.

छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन राष्ट्रवादीत लढाई

मराठवाडय़ात छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघात दोन राष्ट्रवादीतच प्रामुख्याने लढाई होत आहे. या ठिकाणी राष्ट्रवादीच्या डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी अजितदादा गटाचे विद्यमान आमदार सतीश चव्हाण यांना मागे टाकले आहे.

अमरावती शिक्षकमध्ये महायुतीतच सामना

अमरावती शिक्षक मतदारसंघात महायुतीचे अधिकृत उमेदवार आणि बंडखोरांत अटीतटीचा सामना होत आहे. शिंदे गटाचे विद्यमान आमदार किरण सरनाईक पहिल्या तर शिंदे गटाचे बंडखोर माजी आमदार श्रीकांत देशपांडे दुसऱ्या क्रमांकावर आहेत. काँग्रेसच्या आदिती पोहरे या चौथ्या क्रमांकावर आहेत.