पाकव्याप्त कश्मीरमध्ये रविवारी पुन्हा गोळीबार; आणखी दोन आंदोलक ठार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पाकव्याप्त कश्मीरमधील संघर्ष थांबण्याचे नावच घेत नाही. रावळकोटमध्ये रविवारी पुन्हा एकदा रक्तरंजित थरार पहायला मिळाला. पाकिस्तानी रेंजर्स आणि लष्कराच्या जवानांनी केलेल्या दोन गोळीबाराच्या घटनेत दोन आंदोलक ठार झाले असून 9 जण गंभीर जखमी झाले. पहिली घटना पहाटे 4 वाजता तर दुसरी घटना सकाळी 7 वाजता घडली.

एबीपी न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, रावळकोट येथील ईदगाह मैदानाजवळ रविवारी पाकिस्तानी रेंजर्स आणि लष्कराच्या जवानांनी आंदोलकांवर रबर बुलेट आणि एके-47 (AK-47) मधून गोळ्या झाडल्या. पहिली घटना पहाटे 4 च्या सुमारास आंदोलक ईदगाह मैदानाजवळच्या रस्त्यावर नमाज अदा करण्यासाठी जमले असताना घडली. गोळीबारानंतर आंदोलक ईदगाह मैदानाच्या दिशेने धावताना दिसले.

दुसरी घटना सकाळी 7 च्या सुमारास घडली. पाकिस्तानी लष्कर आणि रेंजर्सच्या जवानांनी ईदगाह मैदानावर जमलेल्या आंदोलकांवर गोळ्या झाडल्या. मृतांपैकी एक जण मीरपूरचा आंदोलक होता, तर दुसरा रावळकोटचा रहिवासी होता.

पाकव्याप्त कश्मीरमध्ये 27 जुलै रोजी निवडणुका होत आहेत. या निवडणुकीतील 12 आरक्षित जागांवरून 9 जूनपासून संघर्ष सुरू आहे. या 12 जागा जम्मू-कश्मीरहून पाकिस्तानच्या इतर भागांत स्थलांतरित निर्वासितांसाठी आरक्षित आहेत. मात्र जॉइंट अवामी अ‍ॅक्शन कमिटीने या जागा रद्द करण्यासाठी 9 जूनपासून आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनादरम्यान पाकिस्तानी लष्कर आणि रेंजर्सच्या जवानांनी केलेल्या गोळीबारात आतापर्यंत 55 जणांचा मृत्यू झाला आहे.