
हिंदुस्थान आणि पाकिस्तान हे दोन्ही देश क्रिकेटच्या मैदानात एकत्र येतात तेव्हा सुरू होतो तो महासंग्राम. असाच एक महासंग्राम पाहायची मेजवानी क्रिकेट चाहत्यांना रविवारी मिळणार आहे. कारण रविवारी महिला टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेच्या साखळी फेरीत हिंदुस्थान आणि पाकिस्तान आमने सामने येणार आहेत.
हिंदुस्थान-पाकिस्तान क्रिकेट सामना म्हणजे जगभरातील क्रिकेटप्रेमींसाठी पर्वणीच असते. त्यामुळे बार्ंमगहॅममधील मोठय़ा दक्षिण आशियाई समुदायामुळे एजबस्टन मैदानावर उत्साहपूर्ण वातावरण पाहायला मिळण्याची शक्यता आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील हिंदुस्थानचा महिला संघ यंदाच्या स्पर्धेतील जेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे. स्मृती मानधना, शेफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज, दीप्ती शर्मा आणि रिचा घोष यांसारख्या अनुभवी व आक्रमक फलंदाजांमुळे हिंदुस्थानची फलंदाजी भक्कम दिसत आहे.
फातिमा सना हिच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान संघ या स्पर्धेत धक्कादायक निकालाची अपेक्षा बाळगून आहे. पाकिस्तानची प्रमुख ताकद त्यांच्या फिरकी गोलंदाजीत आहे. सादिया इक्बाल आणि निदा दार या अनुभवी फिरकीपटूंवर भारताच्या धावगतीवर लगाम घालण्याची जबाबदारी असेल. दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत 16 सामने झाले असून, हिंदुस्थानने तब्बल 13 सामने जिंकले आहेत. पाकिस्तानला केवळ 3 विजय मिळवता आले आहेत.
सामन्याची वेळ ः रात्री 11.00 वाजता
थेट प्रक्षेपण ः स्टार स्पोर्ट्स वाहिन्या आणि जियो हॉटस्टार.
























































