साताऱ्यात 105 गावांना 97 टँकरने पाणीपुरवठा, पाऊस लांबल्यास पाणीटंचाईचा प्रश्न ऐरणीवर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सध्या पावसाळा सुरू झाला असला, तरी जिह्यातील 105 गावे व 342 वाड्या पाण्यासाठी तहानलेल्या आहेत. सुमारे 1 लाख 30 हजार 684 नागरिक व 88 हजार 103 जनावरांना सुमारे 97 टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. अजूनही पावसाने ओढ दिल्यास पाणीटंचाईचा प्रश्न आणखी ऐरणीवर येणार आहे.

सातारा जिह्यात फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून पाणीटंचाईचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दिवसेंदिवस कडक उन्हाळा जाणवत असल्याने टंचाईग्रस्त गावांमध्ये वाढ होऊ लागली आहे. उन्हाळी पावसाने काही ठिकाणी हजेरी लावली असली, तरी पाणीटंचाईचा प्रश्न निर्माण झाला आहे. कडक उन्हामुळे भूजलपातळीत घट निर्माण झाली आहे. विहिरी, नदी, नाले, ओढे, तलावांमधील पाणीसाठ्यात दिवसेंदिवस घट होत चालली आहे. ऐन पावसाळ्यात सुमारे 97 टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र, पावसाने अशीच ओढ दिल्यास आणखी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गहण होणार आहे.

माण तालुक्यातील बिजवडी, पाचवड, पांगरी, येळेवाडी, मोगराळे, वडगाव, जाधववाडी, राजवडी, तोंडले, अनभुलेवाडी, थदाळे, मोही, दानवलेवाडी, हस्तनपूर, इंगिरेवाडी, वावरहिरे, संभूखेड, पळशी, मार्डी, इंजबाव, शिरवली, उकिर्डे यांसह 44 गावे व 269 वाडय़ांमधील 61 हजार 246 नागरिक व 56 हजार 488 जनावरांना 46 टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.

खटाव तालुक्यातील सुर्याचीवाडी, दातेवाडी, एनकूळ, कणसेवाडी, खातवळ, यलमारवाडी, तडवळे, गारवडी, मोळ, मांजरवाडी, शिंदेवाडी, रणसिंगवाडी, चिंचणी, नवलेवाडी, पांढरवाडी, कामथी, कातळगेवाडी, रेवलकरवाडी, जाखणगाव, कोकराळे, अंमेरी, गादेवाडी, गोसाव्याचीवाडी, जायगाव, करांडेवाडी, खबालवाडी, नांदोशी, मांडवे, पडळ, कान्हरवाडी यांसह 30 गावे व 58 वाड्यांमधील 32 हजार 859 नागरिक व 5 हजार 153 जनावरांना 18 टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.

वाईतील 6 गावे व 8 वाड्यांमधील 5 हजार 390 नागरिक व 8 हजार 306 जनावरांना 6 टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. पाटण तालुक्यातील एका गावातील व 7 वाड्यांमधील 2 हजार 389 नागरिक व 1 हजार 480 जनावरांना 8 टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. खंडाळा तालुक्यातील एका गावामधील 506 नागरिकांसाठी एक टँकर सुरू आहे.

43 विहिरी व 24 कूपनलिका अधिगृहित

कोरेगाव तालुक्यातील 22 गावांमधील 28 हजार 141 नागरिक व 16 हजार 488 जनावरांना 17 टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. महाबळेश्वर तालुक्यातील एका गावामधील 153 नागरिकांना एका टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. टँकर भरण्यासाठी 43 विहिरी व 24 कूपनलिका अधिगृहित करण्यात आल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता गौरव चक्के यांनी दिली.